अनुकूल निकालासाठी न्यायमूर्तीच्या नावावर लाच मागितल्याचा आरोप

न्यायालयीन प्रकरणात आपल्याला अनुकूल निकाल देण्याची हमी देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या नावावर कथितरीत्या लाच मागितली जात असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने गुरवारी सर्वात ज्येष्ठ अशा पाच न्यायमूर्तीचा समावेश असलेल्या घटनापीठाकडे सोपवली.

ओदिशा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश इशरत मसरूर कुद्दुसी यांचेही आरोपी म्हणून नाव असलेल्या सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आलेले आरोप ‘धक्कादायक’ असल्याचे मत व्यक्त करतानाच, ही याचिका घटनापीठापुढे १३ नोव्हेंबरला सुनावणीला येईल असे न्यायालयाने सांगितले.

सीबीआयच्या एफआयआरचा उगम असलेल्या वैद्यकीय प्रवेश प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ करत आहे. त्यामुळे त्यांचा या घटनापीठात समावेश करू नये, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील दुश्यंत दवे यांच्या खंडपीठाने केला होता. या पाश्र्वभूमीवर, ५ सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती घटनापीठाचे सदस्य राहतील हा निर्णय महत्त्वाचा आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी निवृत्त सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर न्या. जे. चेलमेश्वर व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार व सीबीआयला नोटीस जारी केली.

याचिकाकर्त्यां वकील कामिनी जैस्वाल यांची बाजू मांडणारे अ‍ॅड. दवे यांनी निवृत्त न्यायमूर्ती कुद्दुसी यांना ज्या आधारे अटक करण्यात येऊन नंतर जामीन मंजूर करण्यात आला, त्या सीबीआयच्या एफआयआरचा दाखला दिला. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशाशी संबंधित एका प्रकरणात अनुकूल आदेश मिळवण्यासाठी कट रचण्यात आला आणि प्रचंड लाचेची मागणी करण्यात आली. त्यामुळे सीबीआयने आरोप केलेल्या बाबी धक्कादायक आहेत असे दवे यांनी सांगितले.

दवे यांनी विनंती केल्यानुसार, सीबीआयने या प्रकरणाच्या तपासात गोळा केलेल्या पुराव्याबाबतची कागदपत्रे बंद लिफाप्यात ठेवावी आणि ती घटनापीठासमोरील सुनावणीत सादर करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले.

छत्तीसगड उच्च न्यायालयातही काम केलेले न्या. कुद्दुसी यांना, विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास बंदी घातलेल्या एका वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित प्रकरणाचा कथितरीत्या सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल लखनौ येथील एका वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष बी.पी. यादव, त्यांचा मुलगा पलाश यादव व इतर तिघांसह अटक करण्यात आली होती.