सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांचे प्रतिपादन
सद्य:स्थितीत न्यायसंस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली असून न्यायसंस्थेसाठी हे एक मोठे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जायचे असल्यास न्यायाधीशांनी त्यांच्या कर्तव्यपालनात कठोर असायला हवे, वेळेचे काटेकोर पालन त्यांनी करायला हवे आणि सर्वोत्तमाचा ध्यास धरायला हवा, असे प्रतिपादन सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी येथे केले.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या १५०व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित येथील कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी न्यायसंस्थेच्या विद्यमान अवस्थेवर भाष्य केले. न्यायसंस्थेने कसोटीच्या काळात आपली कर्तव्ये कठोरपणे निभावली आहेत. तेव्हाही न्यायसंस्थेपुढे अनेक आव्हाने होती, आताही आहेत. मात्र सद्य:स्थितीतील आव्हान वेगळे आहे. न्यायसंस्थेची विश्वासार्हताच धोक्यात येऊ पाहात असून हे आव्हान या व्यवस्थेतूनच आले आहे, हे बाह्य़ आव्हान नाही. बाह्य़ आव्हानांचा न्यायसंस्थेने यशस्वी मुकाबला केला आहे. मात्र आता अंतर्गत आव्हानाला तोंड देण्यासाठी न्यायसंस्थेला सज्ज व्हावे, असे सरन्यायाधीश म्हणाले.
प्रलंबित खटल्यांच्या वाढत्या संख्येबद्दल ठाकूर यांनी चिंता व्यक्त केली. प्रलंबित खटल्यांमुळे अनेक लोकांना विनाकारण तुरुंगात खितपत पडावे लागते. जलदगतीने न्यायदान व्हावे यासाठी न्यायाधीशांची तयारी असते, परंतु बहुतेकदा वकिलांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बारकडूनच सहकार्य मिळत नाही. सुट्टीच्या दिवशीही किंवा जास्त वेळ काम करून न्यायदान करण्याचीही न्यायाधीशांची तयारी असते, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

प्रलंबित खटल्यांची संख्या जास्त आहे. अनेकदा न्यायाधीशांची जास्त वेळ बसून खटल्यांचा निपटारा करण्याची तयारी असते. परंतु बहुतेकदा बार सहकार्य करत नाही, असे आढळून आले आहे. अन्यथा सुट्टीच्या दिवशीही न्यायालय सुरू ठेवून खटले सोडवण्याची न्यायसंस्थेची तयारी आहे.
– टी. एस. ठाकूर, सरन्यायाधीश

सरन्यायाधीश म्हणाले..
* न्यायसंस्थेवर नेहमीच लोकांचे लक्ष असते. बारशिवाय न्यायप्रशासन अपूर्ण आहे
* बारमुळेच चांगले न्यायाधीश निर्माण होतात. अनेकदा प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यात बार सहकार्य करत नसल्याचे दिसून आले आहे
* वकील व न्यायाधिशांनी त्यांच्या कर्तव्यांचे पालन कठोरपणे करणे अपेक्षित आहे