अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये एका भारतीय महिलेचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे. काबूलच्या क्यूला-ए-फतुल्ला या भागातून गुरुवारी रात्री चाळीस वर्षीय जुडिथ डिसुझा या महिलेचे अपहरण करण्यात आले असून, भारतीय दूतावासाकडून डिसुझा यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत. डिसुझा यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरील माहितीनुसार, त्या अफगाणिस्तानातील अगा खान फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करतात. २०१५ साली त्या या संस्थेत रुजू झाल्या. याआधी त्यांचा भारतातील एका संस्थेत सोशल आणि पर्यावरण तज्ञ म्हणून १५ वर्षांचा अनुभव आहे. भारतात पश्चिम बंगाल, पडुच्चेरी, तमिळनाडू आणि ओदिशा या राज्यांत त्यांनी काम केले आहे. काबूल येथे आपल्या सहकाऱयांसोबत कामावरून घरी परतत असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. तालिबानकडून अपहरण झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानातील प्रशासन जुडिथ डिसुझा यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे. तसेच भारतीय दुतावास देखील अफगाणिस्तानच्या प्रशासनाशी संपर्कात आहे.