संयुक्त राष्ट्रांच्या कार्यकारी गटाचा निर्णय, ब्रिटन, स्वीडनने निकाल फेटाळला, युरोपीय अटक वॉरंट कायम राहणार असल्याचे ब्रिटनकडून स्पष्ट
विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांज (वय ४४) याला स्वीडन व ब्रिटनने अनाधिकाराने पाच वर्षे स्थानबद्ध केले होते. आता त्याला सोडून देण्यात यावे तसेच बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याने या देशांनी त्याला भरपाई द्यावी, असा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या कार्यकारी गटाने दिला आहे. दरम्यान ब्रिटन व स्वीडन या दोन्ही देशांनी हा निर्णय आमच्यावर बंधनकारक नाही असे सांगून त्यामुळे परिस्थितीत काहीही बदल होणार नाही, इक्वेडोरच्या दूतावासात राहून तो अटकेची कारवाई टाळत असून त्याला बेकायदेशीररीत्या स्थानबद्ध केलेले नाही असे स्पष्ट केले आहे. कार्यकारी गटाचे प्रमुख सेआँग फिल हाँग यांनी सांगितले की, असांज याची स्थानबद्धता बेकायदेशीर होती. त्यामुळे त्याला सोडून देऊन उलट ब्रिटन व स्वीडनने भरपाई द्यावी. ब्रिटन व स्वीडन यांच्या विरोधात आपण हरलो असून शुक्रवारी इक्वेडोर दूतावासातून बाहेर पडून आपण अटक पत्करू कारण आता यात अपील करण्यात अर्थ नाही असे असांज याने ट्विटरवर म्हटले होते.
बेकायदेशीर स्थानबद्धतेबाबत संयुक्त राष्ट्रांच्या कार्यकारी गटाने दिलेल्या आदेशानुसार असांज याला आधी स्वीडनमध्ये स्थानबद्ध करण्यात आले व नंतर ७ डिसेंबर २०१० रोजी युरोपीय वॉरंटनुसार अटक करण्यात आली होती पण तेव्हा तो जामीनावर सुटला व नंतर त्याने इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला होता. त्याच्या स्थानबद्धतेत मानवी, नागरी व राजकीय हक्कांचे उल्लंघन करण्यात आले आहे, असे मत पथकाने व्यक्त केले. पाच सदस्यांच्या हक्क गटाने असांजला सोडून देण्याचा आदेश दिला असून त्याच्या संचार स्वातंत्र्याचा आदर करावा व नुकसानभरपाई द्यावी असे म्हटले आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांनी जरी असा आदेश दिला असला तरी आम्ही त्या विरोधात अपील करू शकतो. परराष्ट्र मंत्री फिलिप हॅमंड यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रांच्या पथकाने दिलेला निर्णय हास्यास्पद आहे व असांज हा फरारी असलेला आरोपी आहे. असांज जर दूतावासातून बाहेर पडला तर त्याला अटक केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या पथकाचा निकाल ब्रिटनला बंधनकारक नसून युरोपीय अटक वॉरंट कायम राहणार आहे. त्यामुळे असांजला सोडून देण्यास किंवा ब्रिटनचा विरोध आहे. असांज याला २०१० मध्ये लंडनच्या वँडस्वर्थ तुरुंगात दहा दिवस ठेवण्यात आले होते. इक्वेडोरच्या दूतावासातही तो नजरकैदेतच आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या पथकाने म्हटले आहे. पथकातील पाच व्यक्तींपैकी असांजच्या बाजूने तीन जणांनी, तर २ जणांनी विरोधात मत दिले तर एक जण तटस्थ राहिला.

असांज कोण आहे?
ज्युलियन असांज हा ऑस्ट्रेलियाचा नागरिक असून तो संगणकाची सांकेतिक भाषा उलगडून संदेश नेमका काय लिहिला आहे हे सांगू शकतो म्हणजे तो संगणक हॅकर आहे. त्याने २००६ मध्ये विकिलिक्सच्या माध्यमातून असे संदेश उघड करून अमेरिकेसह अनेक देशांचे भांडाफोड केले होते. एप्रिल २०१० मध्ये तो प्रथम प्रकाशझोतात आला. त्याने अमेरिकी सैनिकांनी इराकमध्ये हेलिकॉप्टरमधून केलेल्या गोळीबारात १८ नागरिक ठार झाल्याची चित्रफीत संकेतस्थळावर प्रसारित केली होती. त्याच्या समर्थकांच्या मते तो सत्यशोधक आहे, पण त्याच्या टीकाकारांच्या मते त्याने संवेदनशील माहिती जाहीर करून अनेक लोकांचे जीव धोक्यात आणले आहेत. इराकमध्ये अमेरिका व ब्रिटनने केलेले युद्धगुन्हे व अत्याचार असांजने उघड केले होते. २००६ मध्ये त्याने विकिलिक्सची स्थापना केली. त्या माध्यमातून त्याने अमेरिकी लष्कराच्या अफगाण-इराक बाबतच्या ५ लाख फाईल्स व इतर अडीच लाख राजनैतिक फाईल्स उघड केल्या होत्या. लैंगिक छळाच्या आरोपात त्याला स्वीडनच्या ताब्यात दिले गेले, तर स्वीडन त्याला अमेरिकेच्या हवाली करण्याची शक्यता आहे. स्वीडनमध्ये त्याच्या विरोधात लैंगिक छळाचे दोन खटले आहेत. अमेरिकेत त्याच्यावर हेरगिरीचे गंभीर आरोप आहेत.
आतापर्यंत काय झाले?
२०१० मध्ये असांजने लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला. अन्यथा त्याला लैंगिक छळाच्या एका प्रकरणात स्वीडनच्या ताब्यात दिले जाणार होते, पण त्याने लैंगिक छळाचे आरोप फेटाळले आहेत. त्याच्या विरोधातील प्रत्यार्पणाची कारवाई सुरू ठेवावी असा निकाल ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
आता पुन्हा चर्चेत कसा
असांज याने संयुक्त राष्ट्रांच्या पथकाकडे २०१४ मध्ये अशी तक्रार केली होती की, बेकायदेशीररीत्या स्थानबद्ध करण्यात आले असून आपल्याला अटक केल्याशिवाय देश सोडता येणार नाही. ३० चौरस मीटर इतक्या कमी जागेत इक्वेडोरच्या दूतावासात राहावे लागले त्यामुळे सूर्यप्रकाश व हवाही मिळाली नाही त्यामुळे मानसिक आरोग्यही बिघडले आहे असे त्याने म्हंटले होते. त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला.