लंडन : अमेरिकेसह अन्य देशांची गोपनीय राजनैतिक, लष्करी कागदपत्रे आणि माहिती फोडून जगभर खळबळ माजविणारा विकिलीक्सचा सहसंस्थापक ज्युलियन असांज याला लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासातून गुरुवारी अटक करण्यात आली. इक्वेडोरने असांजला दिलेला आश्रय मागे घेतल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

विकिलीक्सने अमेरिकी सरकारची गोपनीय माहिती फोडून खळबळ माजवली होती. याप्रकरणी असांजला अमेरिकेत फाशीची शिक्षा होऊ शकते किंवा त्याचा तिथे छळ होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेला प्रत्यार्पण होण्याच्या भीतीने ऑस्ट्रेलियाचा नागरिक असलेल्या असांजने जवळपास गेली सात वर्षे लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला.

अखेर असांजला अटक करण्यात आली असून, त्याला  वेस्टमिन्स्टर न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जामिनाच्या अटीचा भंग केल्याने असांजविरोधात २९ जून २०१२ रोजी न्यायालयाने बजावलेल्या वॉरंटनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे लंडन पोलिसांनी सांगितले.

असांज याने २०१० मध्ये अनेक गोपनीय कागदपत्रे फोडली होती. त्याला इक्वेडोरचे नागरिकत्व मिळाले होते. त्यानंतर २०१२ पासून तो इक्वेडोरच्या दूतावासात वास्तव्य करीत होता.

असांजचे इक्वेडोरचे नागरिकत्व मागे

ज्युलियन असांजला देण्यात आलेले इक्वेडोरचे नागरिकत्व मागे घेण्यात आले आहे. इक्वेडोरचे अध्यक्ष लेनिन मोरेनो यांनी हा निर्णय घेतला. वारंवार आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन करण्याबरोबरच शिष्टाचारभंगामुळे असांजला दिलेला राजकीय आश्रय काढून घेण्याचा सार्वभौमत्त्वाचा अधिकार आपण बजावल्याचे मोरेनो यांनी सांगितले.

सुरक्षित देशात प्रत्यार्पण

जुलियन असांज याचा छळ होऊ शकेल किंवा त्याला मृत्युदंड होऊ शकेल अशा कुठल्याही देशात त्याचे प्रत्यार्पण करण्यात येणार नाही, असे इक्वेडोरचे अध्यक्ष लेनिन मोरेनो यांनी म्हटले आहे. ज्या देशात मृत्युदंडाची तरतूद आहे किंवा जेथे छळ होऊ शकेल अशा कुठल्याही देशात असांजचे प्रत्यार्पण केले जाणार नाही, अशी हमी मी ब्रिटनकडे मागितली आहे, असे मोरेनो यांनी म्हटले आहे.

कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही : थेरेसा मे

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ज्युलियन असांजच्या अटकेचे स्वागत केले. ब्रिटनमध्ये कायद्यापेक्षा कोणीच मोठे नाही, असे सांगत मे यांनी पोलीस आणि इक्वेडोरचे सहकार्याबद्दल आभार मानले.