संयुक्त राष्ट्रे : यंदाचा जुलै महिना हा आतापर्यंतच्या जागतिक हवामान इतिहासातील सर्वात उष्ण महिन्याच्या तोडीचा किंवा त्यापेक्षाही उष्ण असल्याची शक्यता जागतिक हवामान संघटनेच्या माहितीत व्यक्त करण्यात आली आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी व्यक्त केली आहे.

संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी सांगितले की, यापूर्वी जुलै २०१६ हा सर्वात उष्ण महिना नोंदला गेला होता. त्या वर्षांत एल निनो परिणाम सुरू असअसल्याने उष्णतामान जास्त होते. चालू वर्षी एल निनोचा फारसा परिणाम नसतानाही जुलै महिना सर्वात उष्ण ठरला आहे. एल निनो महासागरी जलाच्या नैसर्गिक तापमानवाढीशी संबंधित असून त्यामुळे जगात तापमान वाढून पर्जन्यमानात मोठे बदल दिसून येत असतात. त्यात काही भागात पूर तर काही भागात दुष्काळ अशी टोकाची हवामान परिस्थिती येते.

गट्रेस म्हणाले की, हवामानाची ताजी आकडेवारी पाहिली तर नवी दिल्ली, पॅरिस, सँटियागो, अ‍ॅडलेट, आक्र्टिक क्षेत्र येथे वाढीव तापमानाची नोंद झाली आहे. २०१५ ते २०१९ ही सर्वात उष्ण अशी पाच वर्षे होती. जर सर्व देशांनी हवामान बदलांबाबत तातडीने कृती केली नाही तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. आता जे परिणाम दिसतात ते हिमनगाचे केवळ टोक आहे. आक्र्टिक  सागरातील बर्फ हे सर्वात नीचांकी पातळीवर असून युरोपात गेल्या महिन्यात उष्णतेची लाट होती. त्यात आक्र्टिक व ग्रीनलँडमध्ये १० ते १५ अंश सेल्सियस इतकी तापमानवाढ झाली. हवामानातील घातक बदल टाळणे हे जगण्यासाठी आवश्यक आहे. ही लढाई आपण जिंकली पाहिजे. त्यासाठी २१ सप्टेंबरला युवक हवामान बदल परिषद आयोजित करण्यात येत आहे. त्यात स्वीडिश हवामान कार्यकर्ती असलेल्या सोळा वर्षांच्या ग्रेटा थुनबर्ग हिचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. केवळ भाषणे करून हा प्रश्न  संपणार नाही. त्यासाठी सरकारे, उद्योग आदींनी ठोस कृती करावी.

चिलीपासून फिनलंडपर्यंत, ब्रिटनपासून मार्शल बेटांपर्यंत कार्बन कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू असून इथिओपिया ते न्यूझीलंड, फिजी ते पाकिस्तान अशा सर्वच देशात लाखो झाडे लावण्याच्या योजना सुरू आहेत. त्यामुळे वातावरणातील कार्बन डायॉक्साईड कमी होईल, याच कारणाकरिता उद्योगांनीही तापमानवाढ रोखण्यासाठी १.३ लाख कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे.

-अँतोनियो गट्रेस, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्रे