हरियाणामध्ये सीटवरुन झालेल्या भांडणातून जुनैद खान या १५ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी जुनैद खानला न्याय मिळेल असे आश्वासन दिल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली असून बुधवारी पोलिसांनी तीन जणांना अटक केली.

गेल्या आठवड्यात १५ वर्षांच्या जुनैदची हरियाणातील बल्लभगडवरुन परतत असताना रेल्वे स्थानकावर हत्या करण्यात आली होती. रेल्वे प्रवासादरम्यान जुनैद आणि त्याचा भावांचे चार-पाच तरुणांशी सीटवरुन भांडण झाले. यानंतर या तरुणांनी ‘गोमांस खाणारे’ म्हणत जुनैद आणि त्याच्या भावंडांच्या डोक्यावरील टोपी उडवून लावली आणि दाढी खेचण्याचा प्रयत्न केला. भांडणानंतर जुनैद रेल्वे स्थानकावर उतरला. यावेळी त्याला मारहाण करण्यात आली. एकाने जुनैदला चाकूने भोसकले. यानंतर जखमी जुनैदचा रेल्वे स्थानकावरच मृत्यू झाला होता.

जुनैदच्या हत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. हरियाणामधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी जुनैदला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर राज्यातील पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. पोलिसांनी चार जणांना अटक केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीदेखील जुनैदच्या हत्येवर प्रतिक्रिया दिली. जुनैदची हत्या ही अत्यंत क्रूर घटना असून या घटनेचा आम्ही विरोध करतो. यातील दोषींना कठोर शिक्षा होणारच असे त्यांनी सांगितले.