पश्चिम बंगालमध्ये आठवडाभरापासून सुरू असलेला डॉक्टरांचा संप अखेर मिटला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर तोडगा निघाला आहे.

कोलकातातील मंत्रालयाजवळ असलेल्या एका सभागृहात डॉक्टर आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये बैठक झाली. विशेष म्हणजे या बैठकीचे लाइव्ह कव्हरेज करण्यासही ममतांनी परवानगी दिली होती.बैठकीला पश्चिम बंगालमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी उपस्थित होते. सोमवारी झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी सकारात्मक भूमिका घेतली. बैठकीतूनच ममता यांनी कोलकाताचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांना शहरातील प्रत्येक रुग्णालयात एक पोलीस अधिकारी तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत.

ज्युनिअर डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवत संप पुकारण्यात आला होता. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा करा, डॉक्टरांना सुरक्षा पुरवा अशा मागण्या प्रामुख्याने करत हा संप पुकारण्यात आला आहे. कोलकातामधील डॉक्टरांना पाठिंबा दर्शवण्यासाठी देशभरातील डॉक्टरही संपावर गेले होते. त्यामुळे देशातील मोठ्या शहरांमध्ये वैदकीय सेवांवर परिणाम झाला होता.