करोनामुळे काय काय बघावं लागणार असं वाक्य आता प्रचलित होताना दिसत आहे. दैनंदिन आयुष्यातील बदलांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत सगळंच चित्र करोनामुळे बदलून गेलं आहे. अगदी थाटात होणारे विवाह सोहळेही कमी गर्दी आणि शांततेत पार पडताना दिसत आहे. त्यातही कुणाला तरी करोना झाल्याचं कळालं तर मग फजितीच फजिती. अशीच एक घटना राजस्थानात घडली आहे. लग्नाला काही तास शिल्लक असताना नवरी करोना पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे दोघांनाही पीपीई किट घालून फेरे घ्यावे लागले.

करोनाचा प्रसार होत असतानाही लोकांकडून महत्त्वाचे कार्यक्रम, विवाह सोहळे आयोजित केले जात असल्याचं दिसत आहे. पण, त्यालाही करोनाची नजर लागताना दिसत आहे. राजस्थानातही असेच एक प्रकरण समोर आले आहे. राजस्थानात चक्क एका कोविड सेंटरमध्येच करोना पॉझिटिव्ह असलेल्या नवरीचा विवाह सोहळ पार पडला. सोशल मीडियावर या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


राजस्थानमधील बारण जिल्ह्यातील येथील केलवाडा गावात एका विवाह सोहळ्यात नवरीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विवाहस्थळी धाव घेतली. तपास सुरू केला. त्यानंतर नवरीला कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आणि अन्य उपस्थित पाहुण्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर, नवरीच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी आणि उपविभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून कोविड सेंटरमध्येच विवाह सोहळा पार पाडण्याचे ठरवले. यावेळी कोविड सेंटरमध्ये करोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमांचं पालन आणि पीपीई किट घालून हे लग्न लावण्यात आले.

या विवाहसोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून सर्वत्र व्हायरल झाल्याने हे लग्न चर्चेचा विषय ठरले आहे. या विवाह सोहळ्याला वधू आणि वर आणि त्यांचे पालक तसेच प्रशासनाचे उच्च अधिकारीही उपस्थित होते. विवाहसोहळा पार पडल्यानंतर नवरीला कोविड सेंटरमध्येच ठेवण्यात आले आहे.