नव्या निवडीसाठी अनिवासी भारतीय श्री श्रीनिवासन यांचे नाव आघाडीवर
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या निवडीची रणधुमाळी सुरू असतानाच तेथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अँटनीन स्कालिया हे मृतावस्थेत सापडले असून, त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आता राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. पुढील प्रत्येक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा कल नवीन न्यायाधीशांच्या निवडीवर अवलंबून असणार आहे.
स्कालिया (वय ७९ ) हे देशातील सर्वाधिक काळ सेवा करणारे न्यायाधीश होते. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या जागी भारतीय वंशाचे अमेरिकी न्यायाधीश श्री श्रीनिवासन यांची नेमणूक करण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. बिंग बेंड भागातील सिबोलो क्रीक रांच या रिसॉर्टवर ते शुक्रवारी गेले होते व तेथे एका खासगी मेजवानीस उपस्थित होते. इतरही चाळीस लोक तेथे होते. अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्कालिया हे वरिष्ठ व बुद्धिमान न्यायाधीश होते असे म्हटले आहे. त्यांच्या निधनाने रिकामी झालेली जागा भरली जाईल असेही त्यांनी सांगितले. स्कालिया यांचा अनपेक्षित मृत्यू हा चर्चेचा विषय असून, आता त्यांच्या जागी आपल्याच व्यक्तीची वर्णी लावण्यासाठी राजकीय पक्षात चढाओढ आहे. ओबामा यांनी नवीन न्यायाधीशाचा निर्णय आता त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांवर सोपवावा असे रिपब्लिकनांनी म्हटले असले तरी ओबामा यांनी आपण न्यायाधीशाची निवड करू असे जाहीर केले आहे. स्कालिया यांनी अमेरिकी राज्यघटनेला तिलांजली देण्याचे अनेक प्रयत्न न्यायदान करताना हाणून पाडले होते. अमेरिकेतील मार्शल सेवेच्या प्रवक्त्या दोन सेलर्स यांनी सांगितले, की स्कालिया हे मेजवानीनंतर इतरांच्या आधी खोलीवर गेले, पण सकाळी ते न्याहारीस आले नाहीत तेव्हा काही जण त्यांच्या खोलीकडे गेले असता त्यांचा मृतदेह सापडला. यात गैरप्रकार नसून त्यांचा मृत्यू नैसर्गिक आहे असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2016 2:20 am