News Flash

अयोध्या वाद : ‘मंदिराची पायाभरणी मुस्लिमांनी, तर मशिदीची हिंदूंनी करावी’; शाहरुखने सूचवलेला तोडगा

सरन्यायाधीश बोबडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्याल आला खुलासा

प्रातिनिधिक फोटो

मूळचे नागपूरचे असणारे विधिज्ञ शरद अरविंद बोबडे हे सरन्यायाधीश पदावरुन शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून बोबडे यांना काल एका विशेष कार्यक्रमामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनकडून निरोप देण्यात आला. यावेळी बोबडे यांच्यासंदर्भात बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ अधिवक्ता विक्रम सिंह यांनी एका खास गोष्टीचा उल्लेख केला. अयोध्या जमीन वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थ म्हणून अभिनेता शाहरुख खानला सहभागी करुन घेण्यात यावं बोबडे यांचं मत होतं, असं सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितलं. पहिल्यांदाच यासंदर्भातील खुलासा असा सार्वजनिक पद्धतीने करण्यात आला आहे.

अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या सामितीची स्थापना मार्च २०१९ साली तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या संसदीय खंडपीठाने केली होती. यावेळी बोबडे यांनी शाहरुख खान या सामितीचा भाग असावा यासाठी प्रयत्न केले होते. या प्रयत्नांचं सिंह यांनी कौतुक करताना अभिनेताही यासाठी तयार झाला होता मात्र यासंदर्भात अंतिम काही निर्णय न झाल्याने पुढे काहीच घडलं नाही, असं सांगितलं. न्यायाधीश बोबडे हे जेव्हा अयोध्या सुनावणीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सहभागी झाले होते तेव्हा या समस्येचे सामधान हे मध्यस्थींच्या माध्यमातून कढता येईल यावर त्यांचा विश्वास होता, असंही सिंह यांनी सांगितलं.

मध्यस्थी करण्यासंदर्भात शाहरुख काय म्हणाला होता?

“अयोध्या वादासंदर्भात बोलायचं झालं तर मी तुम्हाला न्यायमूर्ती बोबडे यांच्याबद्दलचं एक गुपीत सांगू इच्छितो. तेव्हा ते या प्रकरणाच्या सुनावणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात सहभागी झाले तेव्हा त्यांनी शाहरुख खान या सामितीचा भाग होऊ शकतो का, अशी विचारणा माझ्याकडे केली होती. मी खान कुटुंबियांना ओळखतो हे त्यांना ठाऊक असल्याने त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता. मी शाहरुख सोबत यासंदर्भात चर्चा केली होती. तो यासाठी तयारही झाला होता,” असं सिंह यांनी सांगितलं.

“मंदिराची पायाभरणी मुस्लिमांकडून करण्यात यावी आणि मशिदीची पायाभरणी हिंदूंनी ठेवावी असंही शाहरुखने सांगितलं होतं. मात्र शाहरुखने मध्यस्थी करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे यासंदर्भात पुढे विचार करण्यात आला नाही. मात्र सांप्रदायिक तणाव मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवण्यासंदर्भात त्याने व्यक्त केलेली इच्छा ही कौतुकास्पद होती,” असं सिंह म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या मध्यस्थी समितीमध्ये माजी न्यायाधीश एफ. एम. आय. कलीफुल्ला, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रवि शंकर आणि वरिष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश होता.

याच कार्यक्रमामध्ये बोलता बोबडे यांनी “मी प्रसन्न मानाने, सद्भभावनेने आणि खूप चांगल्या आठवणी सोबत घेऊन सर्वोच्च न्यायालयाचा निरोप घेत आहे. तसेच मी येथे माझी सर्वोत्तम कामगिरी करु शकलो याचा मला आनंद आहे,” अशा शब्दांमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 9:38 am

Web Title: justice bobde wanted shah rukh khan to be part of the arbitration committee to resolve the ayodhya dispute scsg 91
Next Stories
1 ‘तुमच्याकडील करोना परिस्थिती गंभीर, आम्ही रुग्णवाहिका पाठवतो तुम्ही फक्त…’; पाकिस्तानमधून मोदींना पत्र
2 करोनामुळे देशात दररोज ५,००० मृत्यू होणार?; वॉशिंग्टन विद्यापीठाचा इशारा
3 “मोदींना देशाचा स्वर्गच बनवायचा होता; त्यासाठीचं मतं मागितली, पण…”
Just Now!
X