प्रशिक्षणार्थी महिला वकिलाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. के. गांगुली यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने न्या. आर. एम. लोढा यांच्या नेतृत्त्वाखाली तीन सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल गुरुवारी सरन्यायाधीश पी. सथाशिवम यांच्याकडे सुपूर्द केला.
पीडित महिलेने सर्वोच्च न्यायालयाच्या समितीपुढे आपला जबाब नोंदविला. त्यामध्ये तिने गांगुली यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. तीन फेब्रुवारी २०१२ रोजी गांगुली सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. सध्या ते पश्चिम बंगालमधील मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत. चौकशी समितीची १३, १८, १९, २०, २१, २६ आणि २७ नोव्हेंबरला बैठक झाली. पीडित महिलेची साक्ष नोंदवून घेण्यात आली असून, तिने यासंदर्भात तीन प्रतिज्ञापत्रही दाखल केली आहेत. न्या. गांगुली यांचीही बाजू समितीने नोंदविली असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
समितीच्या अन्य कोणत्याही निष्कर्षांबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. समितीमध्ये न्या. एच. एल. दत्तू आणि न्या. रंजना देसाई यांचाही समावेश होता.