केरळमधील सौम्या बलात्कार आणि हत्येच्या खटल्याच्या निकालावर आक्षेप नोंदवून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागणार आहेत. तशी तयारीही त्यांनी दर्शवली आहे. न्यायालयात सुरू असलेला अवमानता खटला बंद करावा, अशी विनंतीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो. तसेच सौम्या हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात फेसबूक पोस्ट केली होती, ती पेजवरून हटवण्यात आली आहे, असे मार्कंडेय काटजू यांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले आहे. याशिवाय न्यायालयीन सुट्ट्यांच्या आधी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आपले म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

रोखठोक वक्तव्यांमुळे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी असतात. केरळमधील सौम्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निकालावरही त्यांनी सोशल मीडियावर टिप्पणी केली होती. या प्रकरणी न्यायालयानं दिलेल्या निकालात मुलभूत त्रुटी असल्याचे काटजू म्हणाले होते. या प्रकरणातील आरोपी गोविंद चामी याला जन्मठेप सुनावण्यात आली होती. मात्र, खुनाच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर काटजू यांनी नाराजी व्यक्त केली होती. निकालात मुलभूत त्रुटी असल्याचे ते म्हणाले होते. त्यामुळे न्यायालयाने सुनावणीवेळी काटजू यांनाही बोलावले होते.
न्यायाधीशांवर टीका आणि अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीला हजर असलेल्या काटजू यांना न्यायाधीशांचा आणि खंडपीठाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीसही बजावली होती.