सहारा समूहाविरुद्धच्या खटल्याला नवे वळण मिळाले. या खटल्याचे कामकाज सुरू असलेल्या न्या. जे. एस. खेहर यांनी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्या पीठाची नियुक्ती करण्यात आली आहे.
न्या. खेहर यांनी सहा मे रोजी सरन्यायाधीशांना पत्र लिहून त्यांना या खटल्याच्या सुनावणीतून मुक्त करण्याची मागणी केली. त्यानंतर सात मे रोजी सरन्यायाधीशांनी या खटल्याच्या सुनावणीसाठी नव्या पीठाची नियुक्ती केल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे उपनिबंधक राकेश शर्मा यांनी सांगितले.
सहारा समूहाविरुद्धच्या खटल्याची सुनावणी न्या. खेहर आणि न्या. के. एस. राधाकृष्णन यांच्या न्यायालयात सुरू होती. राधाकृष्णन हे १४ मे रोजी निवृत्त झाले. तत्पूर्वी त्यांनी या खटल्याच्या सुनावणीसंदर्भात न्यायालयाच्या पीठावर प्रचंड दबाव असल्याचे म्हटले होते. त्यानंतर खेहर यांनीही या खटल्याच्या सुनावणीतून बाहेर पडण्याची विनंती सरन्यायाधीशांकडे केली. दरम्यान, सुनावणी आता कोणत्या न्यायाधीशांकडे सुपूर्द करण्यात आली आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
न्या. खेहर आणि न्या. राधाकृष्णन यांनी सहा मे रोजी याप्रकरणी दिलेल्या सुनावणीत सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांची जामीन याचिका फेटाळली होती. चार मार्चपासून रॉय हे तिहार तुरुंगात आहेत.