न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूबाबतची सर्व कागदपत्रे सोमवारपर्यंत सादर करावीत, असे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. न्या. लोया यांचा डिसेंबर २०१४ मध्ये नागपूरमध्ये मृत्यू झाला होता.

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणाची सुनावणी करणारे सीबीआयचे विशेष न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या मृत्यूचा स्वतंत्र तपास करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. ज्येष्ठ वकिल दुष्यंत दवे आणि इंदिरा जयसिंह यांनी याबाबत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडेही याचिका दाखल झाल्याचे सांगितले. मात्र, खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी होणार असे स्पष्ट केले.

न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूचा तपास करावा, अशी मागणी महाराष्ट्रातील पत्रकार बी. आर. लोणे यांनी सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे केली होती. विविध पोलीस अधिकारी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे पक्षकार असलेल्या संवेदनशील सोहराबुद्दीन शेख चकमक  प्रकरणाची सुनावणी करत असलेले लोया यांच्या गूढ मृत्यूचा निष्पक्ष तपास होणे आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने लोया यांचा संशयास्पद मृत्यू ही गंभीर घटना आहे, असे सांगितले. राज्य सरकारने सोमवारपर्यंत लोया यांच्या मृत्यूबाबतची सर्व कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

एका सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला गेलेले लोया यांचे १ डिसेंबर २०१४ रोजी हृदयविकोराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूच्या वेळची परिस्थिती आणि त्याचा सोहराबुद्दीन प्रकरणाशी असलेला संबंध याबाबत लोया यांच्या कुटुंबीयानी संशय व्यक्त केल्याचे वृत्त माध्यमांनी दिल्यानंतर हा मुद्दा गेल्या नोव्हेंबरमधे प्रकाशात आला होता.