न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी, यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात यावी, अशी राज्यसभा आणि लोकसभेतील अनेक खासदारांची मागणी असल्याचे राहुल गांधी यांनी शुक्रवारी सांगितले. न्या. लोया यांना न्याय मिळावा या मागणीसाठी विरोधीपक्ष नेत्यांनी शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली.


गांधी म्हणाले, न्या. लोया यांचा मृत्यू हा संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित झाली तर त्यांच्या कुटुंबासाठी देखील ही बाब न्याय्य ठरेल. या चौकशीसाठी १५ राजकीय पक्षांच्या १४४ खासदारांनी एका अर्जावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण या प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करीत आहोत.


गेल्यावेळी न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी अर्धवट राहिली होती. त्यामुळे यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती दवे यांनी न्या. लोया यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकिल आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्यामध्ये जोरदार युक्तीवाद झाला होता.