सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात सात काश्मिरी नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. मार्कंडेय काटजू यांनी या घटनेची तुलना ब्रिटीश काळातील जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. यासोबतच भारतीय लष्करप्रमुखांची तुलना जालियनवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या ब्रिटीश अधिकारी जनरल डायरशी करण्यात आली आहे. मार्कंडेय काटजू यांच्या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

मार्कंडेय काटजू यांनी सुरुवातीला ट्विट करत ही टीका केली होती. यावेळी त्यांनी लिहिलं होतं की, ‘भारतीय लष्कराला शाबासकी..ज्याप्रकारे जनरल डायरने जालियनवाला बागेत आणि लेफ्टनंट कैलीने व्हीएतनाममधील माई लाई येथे केलं अगदी तसंच काश्मीरमध्ये भारतीय सेनेने लोकांना मारण्यास सुरुवात केली आहे. सर्व भारतीय लष्कर अधिकारी आणि जवानांना भारतरत्न दिला पाहिजे’.

मार्कंडेय काटजू यांच्या या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. अनेक अधिकाऱ्यांना मार्कंडेय काटजू यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्कंडेय काटजू यांनी त्यांचं काहीही न ऐकून घेता फेसबुकवर एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी काश्मिरी जनतेला सल्ले दिले आहेत.

मार्कंडेय काटजू यांनी ज्या दोन घटनांचा उल्लेख केला आहे त्यांची नोंद इतिहासात सैन्यांनी केलेली अत्यंत क्रूर कारवाई म्हणून आहे. 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील अमृतसर येथील जालियनवाला बागेत निशस्त्र लोकांवर ब्रिटीश अधिकारी जनरल डायरने गोळ्या चालवण्याचा आदेश दिला होता. तर व्हिएतनाम युद्धावेळी 16 मार्च 1968 रोजी अमेरिकन सैनिक माई लाई गावात दाखल झाले आणि निशस्त्र ग्रामस्थांवर गोळ्या चालवल्या होत्या.