आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती मार्कंडेय काटजू हे पुन्हा एकदा नव्या वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काटजू यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक ब्लॉग लिहिला असून त्या ब्लॉगमध्ये त्यांनी ‘रास्कल बाळ ठाकरे’ असा उल्लेख केला आहे. बाळ ठाकरे हे सर्वाधिक धूर्त नेता होते. ते नेहमी गुंडगिरी करत असेही त्यांनी म्हटले आहे. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यसंस्कारावेळी राष्ट्रपती, पंतप्रधान, सोनिया गांधीसमवेत देशातील दिग्गज लोक सहभागी झाले होते. परंतु मी गेलो नव्हतो. याबाबत आपण त्यावेळी इंग्रजी वृत्तपत्र ‘द हिंदू’मध्ये लेख लिहिल्याचे सांगत तो लेख पुन्हा एकदा ब्लॉगवर प्रसिद्ध केला आहे.
काटजू यांनी ‘व्हाय आय कान्ट पे ट्रिब्यूट टू बाळ ठाकरे’ हा लेख लिहिला असून त्यात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून परराज्यातून मुंबईत राहण्यास आलेल्या लोकांविरोधात हिंसाचार कसा केला याचा उल्लेख आहे. घटनेप्रमाणे भारतातील कोणताही नागरिक कोठेही राहू शकतो याचा दाखला त्यांनी दिला आहे. देशातील कोणत्याही भागातील नागरिक महाराष्ट्रात येऊ शकतो व महाराष्ट्रातील नागरिकही इतर ठिकाणी जाऊ शकतो. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या मते महाराष्ट्र हे फक्त मराठी लोकांसाठी होते. शिवसेनेने १९६० आणि ७०मध्ये दक्षिण भारतीयांवर हल्ले केले. तर २००८ मध्ये बिहार आणि यूपीतून आलेल्या लोकांवर निशाणा साधला होता. मतपेढीसाठीच ते अशा प्रकारचे राजकरण करत असा आरोपही त्यांनी केला.
एक दिवसापूर्वीच काटजू यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर तीव्र शब्दात टीका करत मनसे दुर्बल लोकांवर हल्ला करते. त्यांच्यात हिंमत असेल तर आपल्यासमोर त्यांनी यावे. माझी काठी तुमची वाट पाहत असल्याचे म्हटले होते. त्यांनी आपल्या पुढच्या टवि्टमध्ये मनसे कार्यकर्ते गुंड असल्याचे सांगत त्यांनी फक्त अरबी समुद्रातील खाऱ्या पाण्याची चव घेतली आहे. मी संगमाचे पाणी पिलेला अलाहाबादचा गुंड आहे.