नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश स्वतंत्र कुमार यांच्याविरोधात  एका वकील महिलेचा लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल झाली आहे. ही महिला पश्चिम बंगाल नॅशनल यूनिवर्सिटी ऑफ जुरिडिकल सायन्सेस (एनयूजेएस) कोलकात्याची विद्यार्थिनी होती तेव्हा  न्यायाधीश स्वतंत्र कुमार यांच्या कार्यालयात मे, २०११ मध्ये इंटर्नशिप करण्यासाठी आली होती.
३० नोव्हेंबर २०१२ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश यांना या महिलेने पाठवलेल्या ७ पानाच्या पत्रात स्वतंत्र कुमार यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. न्यायाधीश कुमार यांनी आपल्या कमरेवर डावा हात ठेवला व खांद्याचे चुंबन केले. त्यांच्याया कृत्याने आपल्याला मोठा धक्का बसला होता, असे तिने यात म्हटले आहे.  तसेच, आपण तिथे इंटर्न असल्याचे हे दाखविणारे अधिकृत ई-मेलच्या प्रति आणि कोलकत्यात आल्याच्या विमानाच्या तिकीटीदेखील पत्रासह जोडल्या आहेत. विशेष म्हणजे हे पत्र मिळून अनेक महिने उलटले तरी कुमार यांच्याविरूद्ध कोणतेही कारवाई केली गेली नाही. मात्र आता अनेक महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.
महिला वकिलाने केलेले आरोप चुकीचे असल्याचे स्वतंत्रकुमार यांनी म्हटले आहे. जस्टिस कुमार यांच्या म्हणण्यानुसार संबंधित महिला वकिल हिने माझ्यासोबत इंटर्नशिप केली नाही. तसेच, आरोप करणा-या युवतीने आपल्याकडे काम केल्याचेही आठवत नाही. माझ्याकडे आतापर्यंतच्या कालावधीत अनेक इंटर्न येऊन गेले आहेत.  
 ‘जस्टिस स्वतंत्र कुमार यांनी युवा महिलेचे लैंगिक शोषण केले आहे. या युतीने माझ्यावर विश्वास ठेवला असून हे प्रकरण शेवटपर्यंत लढण्याचा तिचा निर्धार आहे. महिला आरोपी न्यायाधीश यांच्याविरोधात एक याचिका दाखल करणार आहे, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल इंदिरा जयसिंह यांनी सूत्रांशी बोलताना सांगितले.  याआधी न्यायाधीस ए के गांगुली यांच्यावरही लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.