मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती विजया ताहिलरामानी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती सरकारी अधिसूचनेत देण्यात आली आहे. ६ सप्टेंबरपासून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने त्यांची मेघालय उच्च न्यायालयात केलेली बदली रद्द करण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी मुख्य न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला.

मद्रास उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीशपदी आता व्ही. कोठारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मद्रास उच्च न्यायालयातून ताहिलरामानी यांच्या केलेल्या बदलीमुळे चेन्नई व महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वकिलांकडून निदर्शने करण्यात आली होती. १२ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले होते,की सयुक्तिक कारणे देऊ नच मुख्य न्यायाधीशांची बदली केली जात असते. सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव संजीव काळगावकर यांनी असे म्हटले होते, की मुख्य न्यायाधीशांच्या बदलीची कारणे उघड केली जात नसतात, कारण त्यामुळे संस्थेच्या हितास बाधा येते. पण जर परिस्थितीमुळे तसे करावे लागले तर ही कारणे न्यायवृंदाकडून उघड केली जाऊ  शकतात.

बदलीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर ताहिलरामानी यांनी सहा सप्टेंबरला राजीनामा दिला होता. त्यांनी हा राजीनामा  राष्ट्रपती कोविंद यांना पाठवला व त्याची प्रत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पाठवली होती. गोगोई यांनी ताहिलरामानी यांच्या बदलीची शिफारस केली होती. ताहिलरामानी यांना गेल्या वर्षी ८ ऑगस्टला बढती देऊ न मद्रास उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश नेमण्यात आले होते. २६ जून २००१ रोजी ताहिलरामानी यांना मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले होते. त्या २ ऑक्टोबर २०२० रोजी निवृत्त होणार होत्या. न्या. शरद बोबडे, न्या. एन.व्ही.रामण्णा, न्या.अरुण मिश्रा व न्या. आर.एफ नरीमन यांच्या न्यायवृंदाने ताहिलरामानी यांची बदली मेघालय उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशपदी करून त्यांच्या जागी मद्रास उच्च न्यायालयात मेघालयचे सरन्यायाधीश ए.के.मित्तल यांची नेमणूक करण्याची शिफारस केली होती.

त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी  न्या. कुरशी यांच्या नावाची शिफारस

त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. अकील कुरेशी यांना बढती द्यावी, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली आहे. यापूर्वी न्या. कुरेशी यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यामध्ये न्यायवृंदाने बदल केला आहे. शुक्रवारी सायंकाळी न्यायवृंदाचा ठराव सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर टाकण्यात आला. न्या. कुरेशी यांना त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती द्यावी अशी शिफारस करण्याचा निर्णय ५ सप्टेंबरच्या बैठकीत घेण्यात आला.