सरन्यायाधीश ठाकूर यांचे प्रतिपादन

सरकार जेव्हा आपल्या कामात अपयशी ठरते तेव्हाच न्यायव्यस्थेला हस्तक्षेप करावा लागतो, असे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

लोकप्रतिनिधी आणि न्यायव्यवस्था यांच्यातील रस्सीखेचाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे विधान केले. सरकारने केवळ आरोप करण्यापेक्षा आपले काम व्यवस्थित करावे. सरकारी यंत्रणा जेव्हा घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरतात तेव्हाच न्यायपालिकेला हस्तक्षेप करावा लागतो. सरकारने जर आपले काम नीट केले तर न्यायालयांना ती जबाबदारी उचलावी लागणार नाही. सरकार जेव्हा न्याय देऊ शकत नाही तेव्हाच नागरिक न्यायालयांकडे वळतात, असे ते म्हणाले.

न्यायाधीशांच्या रिक्त जागांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती पंतप्रधानांना अनेकदा केली आहे. या प्रश्नावर केंद्र सरकारलाही अहवाल पाठवला आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले.