दिल्ली बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराची मुक्तता
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्ली बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराची रविवारी अखेरीस सुटका करण्यात आली. गुन्हा घडतेवेळी त्याचे वय १७ वर्षे असल्याने त्याची सुटका करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले होते. एका स्वयंसेवी संस्थेकडे या अल्पवयीन गुन्हेगाराचा ताबा देण्यात आला असून त्याला अज्ञात स्थळी रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, या गुन्हेगाराची सुटकाच होऊ नये यासाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी शनिवारी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले खरे, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत शिकणाऱ्या एका तरुणीवर चालत्या बसमध्ये सहा जणांनी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. याच प्रकरणातील एका अल्पवयीन गुन्हेगाराची सुटका करण्याचे आदेश शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिले होते. त्याची रविवारी सुटका करण्यात आली. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यात यावी यासाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांनी शनिवारी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या पीठाने सुटकेला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली. पुढील सुनावणीसाठी हे प्रकरण विशेष सुट्टीकालीन पीठाकडे सोपवले. त्यावर आज, सोमवारी सुनावणी होणार आहे.

जीविताला धोका
अल्पवयीन गुन्हेगाराला दिल्लीतील सुधारगृहात ठेवण्यात आले होते. त्याला तेथून रविवारी मुक्त करण्यात आले. उत्तर प्रदेशातील बदायूँ येथे त्याच्या मूळ गावी जायचे की, स्वयंसेवी संस्थेकडे याविषयी त्याला विचारणा करण्यात आली. गावी जीविताला धोका असल्याचे सांगत त्याने स्वयंसेवी संस्थेकडे जाण्यास पसंती दिली.
घटनाक्रम..
’स्वाती मलिवाल यांनी अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्याची मागणी केली
’रविवारी होणारी सुटका स्थगित करावी यासाठी त्यांनी शनिवारी रात्रीच सरन्यायाधीशांच्या घरी धाव घेतली
’पीडित तरुणीचे पालक व दिल्ली विद्यापीठाचे काही विद्यार्थी यावेळी त्यांच्याबरोबर उपस्थित
’मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयात मलिवाल यांच्या मागणीवर विचारविनिमय सुरू. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती न देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
’विशेष सुट्टीकालीन पीठाकडे प्रकरण सोपवण्याचाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. रविवारी सकाळी अल्पवयीन गुन्हेगाराची सुटका

दिल्लीत तणाव : अल्पवयीन गुन्हेगाराची सुटका होऊ नये यासाठी रविवारी पीडित तरुणीचे पालक व विद्यार्थ्यांनी इंडिया गेट येथे आंदोलन सुरू ठेवले. पोलिसांनी त्यांना तेथून ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. नंतर इंडिया गेट परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले.

अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्याच्या प्रकरणात आम्ही असाहाय्य आहोत. राज्यातील असो वा केंद्रातील सरकार असो, तुम्ही निषेध केलात अथवा तुम्हाला लाठीमार सहन करावा लागला तर ते तुमचे म्हणणे फक्त ऐकून घेतात; अन्यथा त्यांना तुमची काही पर्वा नसते. त्याची सुटका होणार हे आधीच माहीत असताना गेल्या तीन वर्षांत त्याच्या सुटकेला स्थगिती देण्यासाठी कोणी काहीच प्रयत्न केले नाहीत. – बद्रीसिंह व आशादेवी पांडे, पीडित तरुणीचे पालक