संपूर्ण देशाला सुन्न करून टाकलेल्या दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील बालगुन्हेगारास तीन वर्षे सुधारगृहात राहण्याची शिक्षा बालगुन्हेगार न्यायमंडळाने शनिवारी ठोठावली. प्रत्यक्षात या गुन्ह्य़ात याच बालगुन्हेगाराने विकृतीचा कळस गाठून हिंसेची परमावधी केली होती. त्यामुळे त्याला फासावरच लटकवावे, या मुलीच्या पालकांच्या मागणीला देशभरातून प्रतिसाद मिळाला होता. बालगुन्हेगार न्यायमंडळाने बालगुन्हेगारासाठी कमाल तरतूद असलेली शिक्षा ठोठावली आहे.
१६ डिसेंबर २०१२च्या रात्री या बालगुन्हेगारासह त्याच्या पाच साथीदारांनी धावत्या बसमध्ये या २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता, तसेच तिला आणि तिच्या मित्राला लोखंडी सळ्यांनी मारहाण करीत बसबाहेर फेकूनही दिले होते. २९ डिसेंबरला तिचे निधन झाले.
हा गुन्हा घडला तेव्हा त्याचे वय १८ वर्षांना काही महिने कमी पडत होते, त्यामुळे बालगुन्हेगार कायद्याचे कवच त्याला लाभल्याने देशभर तीव्र संताप उसळला होता. विकृतीची परमावधी गाठताना आपल्या बालवयाची जाण नसलेल्या आरोपीला शिक्षा भोगताना मात्र बालगुन्हेगार असल्याचा फायदा मिळू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात बालगुन्हेगाराची वयोमर्यादा कमी करावी, या मागणीची जनहित याचिकाही दाखल झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने २२ ऑगस्टला बालगुन्हेगार न्यायमंडळाला आपला निर्णय घेण्याची पूर्ण मुभा दिल्यानंतर प्रधान दंडाधिकारी गीतांजली गोयल यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमंडळाने शनिवारी हा निकाल दिला.  त्या तरुणीच्या मित्राच्या हत्येत सामील असल्याच्या आरोपातून मात्र या बालगुन्हेगारास निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बालगुन्हेगार आठ महिने कोठडीत होता, त्यामुळे तीन वर्षांच्या शिक्षेतून हा कालावधी वगळण्यात येणार आहे.
या प्रकरणातील अन्य सज्ञान आरोपींविरुद्ध शीघ्रगती न्यायालयात सुनावणी सुरू आहे, तर अन्य आरोपी रामसिंग हा तिहार कारागृहात ११ मार्च रोजी मृतावस्थेत आढळला.
*‘जलदगती’ न्यायालयाआधीचा पहिला निकाल
*बालगुन्हेगार कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा
*‘सज्ञान’ आरोपींच्या सुनावणीचा आठवा महिना

स्त्रीभ्रूण हत्याच करा!
या निकालाने खचलेले त्या तरुणीचे वडील म्हणाले, या देशात मुलगी म्हणून जन्माला येणे हाच गुन्हा आहे. हा निकाल पाहता जे पालक स्त्रीभ्रूण हत्या करतात ते योग्यच आहे. ज्या यातना आम्ही भोगत आहोत त्या भोगण्याची वेळ तरी किमान त्यांच्यावर येणार नाही.
ही तर फसवणूक
हा निकाल आम्हाला अमान्य आहे. ही आमची फसवणूक आहे, अशी प्रतिक्रिया त्या मुलीच्या आईने व्यक्त केली. या निर्णयाविरोधात अपील केले जाईल, असे त्यांनी सांगितले.