जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे समोर येत आहे. राहुल गांधींसह पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, शशी थरुर या काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारविरोधात भूमिका घेतलेली असताना काही नेते या निर्णयाचं जाहीर समर्थन करत आहेत.

काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षविरोधी भूमिका घेत कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखचे भारतामध्ये एकीकरण करण्यासाठी जी पावले उचलली आहेत त्याचे मी समर्थन करतो. संवैधानिक प्रक्रियेचे पालन केले असते तर अजून चांगले झाले असते. त्यामुळे कोणाला प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळाली नसती. हा निर्णय राष्ट्रहितासाठी घेण्यात आला असून मी त्याचे समर्थन करतो असे टि्वट ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अशा प्रकारे पक्षविरोधी भूमिका घेणे हा काँग्रेससाठी एक झटका आहे. सध्या त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी असली तरी ते मध्य प्रदेशातील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. राहुल गांधींचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे.

काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं. या यादीत हरियाणाचे दीपेंद्र हुड्डा, जयवीर शेरगिल, भुवनेश्वर कलिता यांच्यापासून ते वरिष्ठ काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांचा समावेश आहे. याशिवाय जनार्दन द्विवेदी यांनी राम मनोहर लोहिया हेदेखील अनुच्छेद ३७० हटवण्याच्या समर्थनात होते असं सांगितलं.

“माझे राजकीय गुरु राम मनोहर लोहिया सुरुवातीपासूनच अनुच्छेद ३७० चा विरोध करत होते. आम्ही विद्यार्थी आंदोलनात याचा विरोध करायचो. माझं वैयक्तिक मत आहे की हा एक राष्ट्राच्या हिताचा निर्णय आहे. उशीर झाला असला तरी स्वातंत्र्यादरम्यान झालेली चूक सुधारण्यात आली आहे” असे जनार्दन द्विवेदी यांनी म्हटलं आहे.