राजकारणात ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या ५० वर्षांपासून राजमाता विजयाराजे शिंदे, माधवराव शिंदे आणि आता ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेश आणि केंद्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी या राजघराण्याचा उपयोग करून घ्यायचे ठरवले आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे ‘जयविलास’ हे निवासस्थान सध्या राजकीय घडामोडींनी गजबजले असून, त्यांच्या मामी माया सिंग यांच्या निवासस्थानी भाजपच्या अनेक बैठका होत आहेत.
ज्योतिरादित्य यांच्याकडे विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रचारप्रमुखाची जबाबदारी दिली आहे. अनेक तरुण चेहऱ्यांना उमेदवारी देऊन ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर काँग्रसने विश्वास टाकला आहे. ग्वाल्हेर, चंबळ आणि गुना या भागांमध्ये शिंदे घराण्याचा प्रभाव आहे. भाजपनेही या परिसरात काँग्रेसवर मात करण्यासाठी शिंदे घराण्याशी संबंधित असलेल्यांनाच उमेदवारी दिली आहे. ज्योतिरादित्य यांची आत्या यशोधरा राजे यांना शिवपुरी मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. ग्वाल्हेर-चंबळ परिसरात विधानसभेच्या ३४ जागा आहेत. या भागांत काँग्रेसला अधिकाधिक जागा मिळवून देण्याचा ज्योतिरादित्य यांचा प्रयत्न आहे