News Flash

“एवढी चिंता राहुल यांना मी काँग्रेसमध्ये असताना असती तर…”; ‘भाजपामधील बॅकबेंचर’ वक्तव्यावर शिंदेंचं उत्तर

ज्योतिरादित्य शिंदेंनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया

प्रातिनिधिक फोटो

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे पुन्हा त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. राहुल गांधी यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले मध्य प्रदेशमधील नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी राहुल यांनी ज्योतिरादित्य शिंदे आज काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, असं वक्तव्य केलं. यावर आता ज्योतिरादित्य शिंदे यांनीही राहुल यांना टोला लगावत उत्तर दिलं आहे. ज्योतिरादित्य यांनी, राहुल गांधी यांनी आधी याबद्दल चिंता केली असती तर बरं झालं असतं, असं म्हटलं आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन मध्य प्रदेशमधील राजकारण सध्या चांगलच तापलं आहे. प्रत्येक पक्षाकडून यासंदर्भात भाष्य केलं जात असतानाच आता खुद्द ज्योतिरादित्य शिंदेंनीही याबद्दल मत व्यक्त केलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे आज काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते असं वक्तव्य करणाऱ्या राहुल यांना शिंदेंनी टोला लगावला आहे. “मी काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधींना माझी एवढी चिंता असती तर चांगलं झालं असतं,” असं खोचक उत्तर ज्योतिरादित्य यांनी या वक्तव्यासंदर्भात बोलताना दिलं आहे.

राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदेंबद्दल बोलताना, ते भाजपामध्ये जाऊन मागील बाकावरील विद्यार्थी झाल्याची टीका केली होती. ते काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते. मात्र भाजपामध्ये ते बॅक बेंचर होऊन गेलेत, असं राहुल म्हणाले होते. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांना एकत्र करुन काँग्रेस संघटना आणखीन मजबूत करण्याचा पर्यायही ज्योतिरादित्य यांच्याकडे होता असंही राहुल म्हणालेत. तुम्ही एक दिवस नक्की मुख्यमंत्री व्हाल, असं मी त्यांना सांगितलं होतं. मात्र त्यांनी वेगळाच मार्ग निवडला, असंही राहुल म्हणाले होते. तसेच पुढे बोलताना, मी तुम्हाला लिहून देतो की ते तिथे कधीच मुख्यमंत्री बनू शकत नाही. त्यासाठी त्यांना परत इकडे (काँग्रेसमध्ये) यावं लागेल, असंही राहुल म्हणाले होते.

भाजपाचा टोला

दुसरीकडे भाजपाचे मध्य प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष वी. डी. शर्मा यांनी राहुल यांनी ज्योतिरादित्य यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राहुल यांना सुनावलं आहे. राहुल यांनी सचिन पायलट यांची चिंता करावी. ते सुद्धा ज्योतिरादित्य शिंदेंचे मित्र आहेत. सर्व काही गमावून बसल्यानंतर राहुल आता अशी वक्तव्य करत आहेत. गरज होती तेव्हा ज्योतिरादित्यांना योग्य सन्मान त्यांनी दिला नाही, असंही शर्मा म्हणाले.

नक्की काय घडलं मागील वर्षी?

मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या २२ समर्थकांसहीत काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला. ज्योतिरादित्य यांच्या या निर्णयामुळे मध्य प्रदेशमधील काँग्रेसचं कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडलं. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यासोबत ज्योतिरादित्य शिंदे यांचे सतत खटके उडत असल्याने त्यांनी पक्ष सोडल्याचं सांगण्यात आलं. दिल्लीमधूनही या नेत्यांमधील वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण राहुल गांधीपर्यंतही पोहचलं होतं. मात्र त्यासंदर्भात पुढे काहीच झालं नाही. अखेर ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाने ज्योतिरादित्य शिंदेंना राज्यसभेची खासदारकी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2021 6:19 pm

Web Title: jyotiraditya scindia responds to rahul gandhi backbencher remark scsg 91
Next Stories
1 या कारणांमुळे इंग्लंडला पत्करावा लागला पराभव; बेन स्टोक्सचा खुलासा
2 पक्षाची नाराजी भोवली! मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा राजीनामा
3 सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल निवडणुकांविरोधात दाखल झालेली याचिका फेटाळली
Just Now!
X