काँग्रेसमधून भाजपामध्ये गेल्यानंतर राज्यसभेचे खासदार झालेल्या ज्योतिरादित्य शिंदेंनी आज संसदेमध्ये बोलताना काँग्रेसला महाराष्ट्रातील १०० कोटी वसुलीच्या प्रकरणावरुन टोला लगावला. ज्योतिरादित्य शिंदे आर्थिक विधेयकासंदर्भात आपलं मत मांडत असतानाच काँग्रेसचे खासदार गोंधळ घालू लागले. त्यावेळेस ज्योतिरादित्य यांनी, “मला तोंड उघडायला भाग पाडू नका,” असा इशारा काँग्रेस खासदारांना दिला. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसला राज्यातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या १०० कोटींच्या वसुलीवरुन सुनावलं. “मला तोंड उघडायला लावू नका. पब आणि रेस्तराँमधून १०० कोटींची वसुली केली जातेय आणि ती सुद्धा थेट गृहमंत्र्यांकडून,” असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस खासदारांना सुनावलं.

राज्यसभेमध्ये ज्योतिरादित्य शिंदे आर्थिक विधेयकासंदर्भात आपलं मत मांडत होते. त्याचवेळी काँग्रेसच्या काही खासदारांनी पेट्रोल-डीझेलच्या किंमतींवरुन आरडाओरड सुरु करत त्यांच्या भाषणामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिंदे यांनी, एका शहराचा दर १०० कोटी रुपये आहे असं म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला. पुढे बोलताना शिंदे यांनी, इंधनाचे दर वाढले आहेत हे जरी सत्य असलं तरी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यालाही मर्यादा असते असं म्हणत इंधनदर वाढीचे गणित विरोधी पक्षाला समजावून सांगितलं. पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवरील खर्च वजा केल्यानंतर राज्यांना ४० टक्के तर केंद्राला ६० टक्के पैसे मिळतात. त्या ६० टक्क्यांपैकीही ४२ टक्के केंद्राकडून राज्यांना परत जातात. त्यामुळे राज्यांना एकूण टक्क्यांपर्यंत पैसे मिळतात तर केंद्राकडे केवळ ३६ टक्के असतात, असं स्पष्टीकरण ज्योतिरादित्य शिंदेंनी दिलं.

ज्योतिरादित्य शिंदेंनी महाराष्ट्रातील इंधनाच्या दरांवरुनही काँग्रेसला सुनावलं. महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. इथे तुम्ही सरकारला सांगत आहात मात्र तिकडे (महाराष्ट्रात) तुम्ही यासंदर्भात काहीच करत नाहीत. मला फक्त एवढचं सांगायचं आहे की ज्यांची स्वत:ची घरं काचेची असतात त्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नयेत, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसच्या खासदारांना खडे बोल सुनावले.

देशाच्या आर्थिक परिस्थितीवरुन बुधावारी संसदेच्या उच्च सदनामध्ये वादळी चर्चा झाल्याचं पहायला मिळालं. करोनाच्या आधीच देशाची अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावरुन खाली उतरल्याचा आरोप काँग्रेसने केला. आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार करोनाचा आधार घेत असल्याचेही काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी अर्थ विधेयक २०२१ वर चर्चा सुरु करताना सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे करोना साथीच्या आधीपासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक होती. मात्र अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भात काही विशेष तरतूद करण्यात आली नाही, अशी टीका केली.