मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. प्रसारमाध्यमांसमोर येण्याआधी राहुल गांधींना काय बोलायचे आहे तो कानमंत्र ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्याची माहिती आता समोर आली आहे. एवढंच नाही राहुल गांधी प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्योतिरादित्य सिंधिया त्यांच्या शेजारीच उभे होते.

ज्योतिरादित्य सिंधिया इतर खासदारांसोबत उभे होते. राहुल गांधीही तिथे चर्चा करत होते. त्याचवेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आले. त्यानंतर लगेचच मोदी जे करू शकले नाहीत ते मी करून दाखवले आहे हे तुम्हाला प्रसारमाध्यमांना सांगायचे आहे असे ज्योतिरादित्य सिंधियांनी राहुल गांधींना सांगितले. त्यानंतर हेच वाक्य म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ज्योतिरादित्य यांनी कानमंत्र दिल्यानंतर राहुल गांधी यांनी मध्यप्रदेश, छत्तीसगढच्या कर्जमाफीचाही उल्लेख केला.

काय म्हटले राहुल गांधी?
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडध्ये सत्ता मिळताच आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषित केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरलं आहे. कर्जमाफीसाठी आम्ही मोदी सरकारला भाग पाडू असं सांगताना कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मोदी सरकारला झोपू देणार नाही असा इशारा राहुल गांधींनी दिला आहे.

नरेंद्र मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांचं एक रुपयाचं कर्ज माफ केलेलं नाही. आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन कर्जमाफीची मागणी करु. कर्जमाफीसाठी आम्ही मोदी सरकारला भाग पाडू. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मोदी सरकारला झोपू देणार नाही असं राहुल गांधी बोलले आहेत. शेतकऱ्यांना हा देश तुमचा आहे कोणा करोडपतींचा नाही. तुमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही तुमचा आवाज पोहोचवण्याचं काम करत आहोत असंही राहुल गांधी म्हटले आहेत.