सामान्यपणे शाळेमधून निवृत्त झाल्यानंतर अनेक शिक्षकांचा शाळेशी असणारा संबंध कमी कमी होत जातो आणि संपतो. मात्र तामिळनाडूमधील एका निवृत्त मुख्यध्यापिकेने आपल्या मालकीची ४ कोटी रुपयांची जमीन सराकरी शाळा बांधण्यासाठी दान केली आहे. एरोडी तालुक्यातील ८० वर्षीय के. पोनमानीदेवी यांनी या आधीही अशाप्रकारे शाळा बांधण्यासाठी जमिनीचा तुकडा दान केला होता.

चित्तोडी जवळील नल्लागुनाडप्पालायम गावातील कुमारनटराजन वरडप्पन यांच्याशी लग्न केल्यानंतर पोनमानीदेवी यांनी १९६४ साली शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. ३२ वर्षे शिक्षिका म्हणून नोकरी केल्यानंतर त्यांनी १९९६ साली निवृत्ती घेतली. निवृत्तीच्या वेळी त्या गोबीचेट्टीपेलयम तालुक्यातील मोदाचूर येथील सरकारी शाळेमध्ये मुख्यध्यापिका होत्या असं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने छापलेल्या वृतात म्हटले आहे.

निवृत्तीनंतर लगेचच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर पोनमानीदेवी त्यांचा मुलगा मयुरा कार्तिकेयन याच्या घरी रहायला गेल्या. मात्र २००१ साली घराचे बांधकाम सुरु असताना डॉक्टर असणाऱ्या मयुराला विजेचा झटका लागल्याने त्याचे मृत्यू झाला. या सर्वानंतर पोनमानीदेवी एकट्या पडल्या. त्यावेळी त्यांची बहीण मराथाल आणि त्यांच्या मुलाने त्यांचा संभाळ केला.

पती आणि त्या पाठोपाठ मुलाचेही निधन झाल्यानंतर पोनमानीदेवी यांनी २००६मध्ये आपल्या वाट्याची जमीन दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या मालकीची २५ टक्के जमीन अनुसूचित जातीजमातींसाठी काम करणाऱ्या सरकारी विभागाला दान केली. या जमिनीवर मागास जाती जमातीमधील मुला-मुलींसाठी वसतीगृह बांधण्यात आली. त्यानंतर ९ वर्षांनी म्हणजेच २०१५ पोनमानीदेवींनी २ लाख रुपये देणगी म्हणून तमिळनाडू शिक्षण मंडळाला देणगी म्हणून दिले. त्या ज्या शाळेतून मुख्यध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या त्या सरकारी शाळेने मुलींची विशेष उच्च माध्यमिक शाळा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यासाठी आर्थिक मदत म्हणून पोनमानीदेवी यांनी ही रक्कम देणगी म्हणून दिली.

मात्र पैसे मिळाल्यानंतरही या शाळेला जागेअभावी केवळ अकरावीपर्यंतचे वर्ग सुरु करता आले. ही बातमी पोनमानीदेवींना समजताच त्यांनी आपल्या मालकीची एक एकर जमीन दान करण्याचा निर्णय घेतला. या जमिनीवर आता बारावीचे वर्ग भरवण्यासाठी इमारत बांधण्यात येणार आहे. पोनमानीदेवींनी शनिवारी या जमिनीचे सर्व कागदपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत. तसेच त्यांनी या इमारतीवर लवकरात लवकर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग बांधण्यात यावेत अशी विनंतीही शिक्षण मंडळाला केली आहे. शिक्षण मंडळानेही त्यांच्या विनंतीला मान देत लगेचच या जमिनीचा ताबा घेऊन इमारत बांधण्यास सुरुवात करणार असल्याचे सांगत याच शैक्षणिक वर्षात बारावीचे वर्ग सुरु करणार असल्याची माहिती पोनमानीदेवींना दिली.

इतक्या मोठ्या प्रमाणात देणगी आणि दान देण्याबद्दल पोनमानीदेवींना विचारले असता जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला चांगली कामे करायची असल्याचे त्यांनी सांगितले. पोनमानीदेवींच्या या कार्यासाठी शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी एक छोटा समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री के. एक. सेनगोट्टीयन यांच्या हस्ते पोनमानीदेवींचा सत्कार केला जाणार असल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तामध्ये नमूद केले आहे.