अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे आज (दि.२१) झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान २५ जण ठार तर सुमारे १८ जण जखमी झाले. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, स्फोटानंतर परिसरात सगळीकडे मृतदेहांचा खच पडला होता. ‘एएफपी’ने च्या वृत्तानुसार, एक आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला उडवले. यामध्ये मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली. गृहमंत्रालयाच्या मते, हा हल्लेखोर चालत आला होता. त्यानंतर त्याने काबूल विद्यापीठाजवळ स्वत:ला उडवले. हा स्फोट काबूल विद्यापीठ आणि अली अबद रूग्णालयादरम्यान झाला. सुरक्षादलांनी परिसर ताब्यात घेतला असून येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अद्याप हल्ल्याची कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही.