३ दहशतवादी ठार, सात तास धुमश्चक्र

काबूलमधील विदेशी लोकांसाठी असलेल्या एका हॉटेलला सोमवारी तालिबानच्या शक्तिशाली ट्रकबॉम्बने धडक दिल्यानंतर तीन दहशतवादी मारले गेले. यानंतर सात तासांपर्यंत बंदुका आणि बॉम्बच्या सहायाने जोरदार धुमश्चक्री सुरू होती. काही दिवसांपूर्वीच गेल्या १५ वर्षांतील सर्वात भीषण हल्ल्यांच्या जखमेतून सावरत असलेल्या राजधानीच्या शहरातील ढासळती सुरक्षाविषयक परिस्थिती यामुळे उघड झाली आहे.

काबूल विमानतळाजवळ असलेल्या नॉर्थ गेट हॉटेलवर झालेल्या या हल्ल्यात पाहुणे आणि कर्मचारी यांना इजा झाली नाही, मात्र बॉम्बफेकीत एक पोलीस ठार झाला. बॉम्बहल्ल्यामुळे हॉटेलची तावदाने कित्येक किलोमीटर दूर फेकली गेली. यामुळे सशस्त्र अतिरेक्यांना कडक बंदोबस्त असलेल्या या हॉटेलमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला.

विदेशी कंत्राटदारांच्या राहण्याचे ठिकाण असलेल्या या परिसरात यापूर्वी जुलै २०१३ मध्ये हल्ला करण्यात आला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला आयसिस या दहशतवादी गटाने काबूलमध्ये केलेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात ८० लोक ठार झाले होते. २००१ साली तालिबानला सत्तेवरून हटवण्यात आल्यानंतर झालेला हा सर्वात भीषण हल्ला होता.

स्फोटकांनी भरलेल्या एका ट्रकने हॉटेलच्या बाहेरील भिंतीला धडक दिली. यात एका पोलिसाला जीव गमवावा लागला व इतर तिघे जखमी झाले, मात्र हॉटेलचे कर्मचारी किंवा पाहुणे यापैकी कुणीही जखमी झाले नाही. ट्रक बॉम्बरसह तालिबानचे तीन दहशतवादी या वेळी ठार झाले, अशी माहिती काबूलचे पोलीस प्रमुख अब्दुल रहमान रहिमी यांनी दिली.

या हल्ल्यानंतर अफगाणी कमांडोजनी नॉर्थगेट परिसराभोवती कडक सुरक्षाव्यवस्था उभारली. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री अडीच वाजता सुरू झालेल्या या हल्ल्यानंतर हा परिसर बॉम्बस्फोट आणि गोळीबार यामुळे हादरून गेला. मोठय़ा प्रमाणावरील ट्रक बॉम्िंबगचे धक्के संपूर्ण शहरात जाणवले.

ट्रकबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर, रॉकेट प्रॉपेल्ड ग्रेनेड्स व इतर शस्त्रांनी सज्ज असलेल्या दहशतवाद्यांनी हॉटेलच्या परिसरात शिरकाव केल्याचे तालिबानचा प्रवक्ता झमिउल्ला मुजाहिद याने सांगितले. शंभरहून अधिक ‘अमेरिकी आक्रमणकर्ते’ या हल्ल्यात ठार किंवा जखमी झाल्याचा दावा त्याने केला. तालिबान आपल्या हल्ल्यांतील बळींचे आकडे नेहमीच फुगवून सांगत असते.