द्रमुकचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचे मंगळवारी सायंकाळी ६.१० मिनिटांनी चेन्नईतील कावेरी रूग्णालयात निधन झाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. देशाने एक ज्येष्ठ नेता गमावला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तामिळनाडू जनतेसाठी त्यांचे योगदान मोलाचे होते.

करूणानिधी यांच्या निधनामुळे मला अत्यंत दु:ख होत असून ते देशातील सर्वांत ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. तळागाळातील लोकांशी जोडले गेलेले ते जनसामान्यांचे नेते होते. एक विचारवंत, लेखक ज्यांनी आपले संपूर्ण जीवन सर्वसामान्यांच्या हितासाठी व्यतित केले, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

प्रादेशिक अस्मिता जपणारे करूणानिधी हे देशाच्या विकासासाठीही जागरूक होते. तामिळी जनतेच्या हितासाठी ते शेवटपर्यंत कार्यरत होते. अनेकवेळा करूणानिधींशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली. आणीबाणीला त्यांनी केलेला विरोध विसरणे अशक्य आहे.

तामिळनाडूतील जनता त्यांना विसरू शकणार नाही. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.