आजम खान यांनी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांना लोकप्रियतेच्या पातळीवर मागे टाकल्याचे दिसते. याचे कारण आहे, पद्मश्री कलीमुल्ला यांनी आंब्याच्या तीन नवीन प्रजाती निर्माण केल्या असून, यातील एका प्रजातीचे नाव आजम खान ठेवल्याचे त्यांनी जाहीर केले. कलीमुल्ला यांनी आंब्याच्या अन्य दोन प्रजातींची निर्मिती केली असून, त्यांचे नामकरण भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या नावाने केले आहे.
पन्नास वर्षांपासून आंब्याच्या नव्या प्रजाती विकसित करण्यावर सतत काम करणारे कलीमुल्ला यांनी मलीहाबाद येथे आपल्या आंब्याच्या बागेत फळाच्या राजाच्या तीन प्रजाती विकसित केल्या आहेत. अनेक वर्षे परिश्रपूर्वक विकसित केलेल्या अंब्याच्या तीन नवीन प्रजातींच्या झाडांना आता आंबे लागले असल्याचे कलीमुल्लांनी सांगितले. या तीन प्रजातींना आजम खान, एपीजे अब्दुल कलाम आणि अमिताभ बच्चन यांचे नाव दिल्याचे त्यांनी जाहीर केले.
या आधी त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, सचिन तेंडुलकर, ऐश्वर्या राय बच्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नावेदेखील आंब्याच्या प्रजाती समर्पित केल्या आहेत. अंब्याच्या तीन नव्या प्रजातींना कलाम, अमिताभ आणि आजम यांचे नाव देण्याची संकल्पना विस्तृत करताना कलीमुल्ला म्हणतात, मौलाना मोहम्मद अली जौहर विश्वविद्यालयाची स्थापना करणाऱ्या आजम खान यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान संस्मरणीय आहे. तर एपीजे अब्दुल कलाम यांच्या राष्ट्र निर्माण कार्याच्या जवळपासदेखील कोणी पोहोचू शकत नाही. तसेच चार दशकांहून अधिक काळ महानायक अमिताभ बच्चन यांनी लोकांचे मनोरंजन केले आहे.
लखनऊपासून हरदोई रस्त्यावर २५ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आंब्यासाठी आपली ओळख निर्माण केलेल्या मलीहाबाद परिसरात कलीमुल्ला यांची आंब्याची बाग आहे. बागेत आंब्याचे एक अनोखे झाड असून, बागेतील ते मुख्य आकर्षण आहे. आंब्याच्या या एकाच झाडाला ३५० प्रकारचे आंबे फळतात. एकाच आंब्याच्या झाडाच्या वेगवेगळ्या फांद्यांना एकाच वेळी ३५० प्रकारचे आंबे लागणे हे जगातील पहिलेच उदाहरण असण्याची शक्यता आहे. यातील काही आंबे दिसायला कारल्यासारखे, तर काही आंबे वांग्याच्या आकारासारखे आहेत. काहींचा आकार बदामासारखा आहे, तर कोणाचे वजन जवळजवळ एक किलो इतके आहे. कलीमुल्ला या झाडास भारत नावाने संबोधतात. आपल्या देशात ज्याप्रमाणे विविध जाती-धर्माचे लोक राहातात त्याचीच प्रतीमा या आंब्याच्या झाडात पाहायला मिळते असे त्यांचे म्हणणे आहे. जर विविधतेने नटलेले हे आंबे मिळूनमिसळून राहातात, तर आपण का राहू शकत नाही, असा प्रश्नदेखील ते उपस्थित करतात.