दहशतवादाचा सामना करताना, अमेरिका आणि इस्राईलचे ‘विस्मरणही नको आणि क्षमाही नको’ हेच धोरण भारताने अवलंबावे, अशी स्पष्ट सूचना भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी केली. तसेच अमेरिका-भारत आणि इस्राईल या तीन राष्ट्रांनी दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दहशतवाद्यांचे जोपर्यंत समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत नियोजनबद्ध हल्ले सुरूच राहतात, याचे भान दहशतवादाविरुद्ध लढताना ठेवले पाहिजे, असे सांगत डॉ. कलाम यांनी भारताने या लढाईत आक्रमक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले.
रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग(रॉ)तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आर.एन्. राव स्मृती व्याख्यानामध्ये ते मार्गदर्शन करीत होते. दहशतवादाशी लढताना एकच सूत्र जोपासायला हवे. ते म्हणजे, ‘दहशतवादी घटनांचे विस्मरणही नको आणि दहशतवादास क्षमाही नको,’ असे डॉ. कलाम यांनी सांगितले. उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा दहशतवादविरोधी लढाईत घ्यावा असे सांगत, अमेरिका-इस्राईल आणि भारत या तीन लोकशाही राष्ट्रांनी या लढाईसाठी एकत्र यावे, असे आवाहन कलाम यांनी केले.
आर.एन्. राव हे ‘रॉ’चे संस्थापक होते. तसेच १९६९ ते १९७७ या कालावधीत भारताच्या बाह्य़ गुप्तचर खात्याचे ते संचालकही होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाचे हे सातवे वर्ष होते. या व्याख्यानामध्ये बोलताना डॉ. कलाम यांनी भारतीय गुप्तचर सेवा नव्याने अस्तित्वात आणावी आणि त्याद्वारे देशातील बुद्धिवान युवकांना एकत्र आणून गुप्तचर खात्यास बळकटी आणावी असेही सुचविले.
गुप्तचर खात्याच्या उत्तरदायित्वाबाबत बोलताना, या खात्याने सुस्पष्ट नेतृत्वाखाली काम करणे गरजेचे असून, माहिती-तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने उपलब्ध माहितीचे पृथ:करण करावे, अशी सूचनाही कलाम यांनी केली.
गुप्त कारवाया या आक्रमक आणि भेदक पद्धतीने करणे ही काळाची गरज असून गुप्तचर खात्याने प्रतिक्रियात्मकतेपेक्षाही उत्तरलक्षी पद्धतीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सायबर गुन्हे हाताळण्यासाठी दोन उपाय सुचवताना डॉ. कलाम यांनी तंत्रज्ञान अद्ययावत राखण्याची तसेच सायबर सुरक्षेबाबत शिक्षण देण्याची गरज असल्याचे नमूद केले.

डॉ. कलाम उवाच
*    भारतीय गुप्तचर सेवा सुरू करावी
*    भेदक कारवाया ही काळाची गरज
*    दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिकेची गरज