सर्वोच्च न्यायालयात ‘एसआयटी’चा अहवाल

नवी दिल्ली : ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील दोन प्रमुख आरोपी फरार असून त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे विशेष तपास पथकाने (एसआयटी) शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

कलबुर्गी यांची कर्नाटकमधील धारवाडच्या कल्याणनगरमधील निवासस्थानी ३० ऑगस्ट २०१५ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून हत्येप्रकरणी आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे, असेही एसआयटीने न्या. आर. एफ. नरिमन आणि न्या. एस. रवींद्र भट यांच्या पीठासमोर सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

एसआयटीने सादर केलेला अहवाल आम्ही पाहिला आहे, हत्या प्रकरणातील दोन प्रमुख आरोपी फरार असून त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे अहवालात म्हटले आहे, या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून हे प्रकरण सुनावणीसाठी सत्र न्यायालयाकडे पाठविण्यात आले आहे, असे पीठाने म्हटले आहे.

कलबुर्गी यांची पत्नी उमादेवी यांची याचिका निकाली काढण्यात आल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत राष्ट्रीय तपास यंत्रणा अथवा सीबीआयमार्फत तपासाची मागणी केली होती.