अरुणाचल प्रदेश विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवनियुक्त मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी कुठल्याही विरोधाशिवाय विश्वासदर्शक ठराव जिंकला. ६० सदस्यांच्या सभागृहातील ४० आमदारांनी एकमताने ठराव मंजूर केला. मावळते मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्यासह काँग्रेसचे १७ आमदार विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस गैरजहर राहिले.
स्वत: मुख्यमंत्री पुल यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या पुल यांच्यासह ४० आमदारांनी हात उंचावून या ठरावाला पाठिंबा दिला. या आमदारांमध्ये गेल्या आठवडय़ात पुल यांना लेखी पाठिंबा देणाऱ्या भाजपच्या ११ व दोन अपक्ष आमदारांचाही समावेश होता.
विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष वांगली लोवांग यांनी पुल यांच्यावरील विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान घेण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्याच्या समर्थनार्थ उभे झालेले हात मोजले. ४० आमदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून, विरोधात एकही मत न पडल्यामुळे हा प्रस्ताव संमत झाल्याचे अध्यक्षांनी उपस्थित असलेल्या सदस्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केले.
गेल्या वर्षी १६ व १७ डिसेंबरला झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी यांना त्यांच्या अनुपस्थितीत पदच्युत करण्यात आल्यानंतर सुरू झालेल्या वादाच्या मालिकेतच पुल यांची १९ फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदी नेमणूक करण्यात आली होती. यापूर्वी, आपले सरकार हे काँग्रेसचे सरकार असून, आपले पूर्वसुरी नबाम तुकी यांच्याबद्दल आपला कुठलाही वैयक्तिक राग नाही, असे राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेत भाग घेताना कालिखो पुल म्हणाले. आमची लढाई भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन याविरुद्धची लढाई होती, त्यात वैयक्तिक स्वरूपाचे काहीच नव्हते. आमचे काँग्रेसचेच सरकार असून भाजपने मुद्दय़ांच्या आधारावर आम्हाला पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रपती राजवटीच्या २५ दिवसांच्या काळात राज्यपाल जे.पी. राजखोवा यांनी उचललेल्या पावलांची पुल यांनी प्रशंसा केली.