दिल्लीत दोन वर्षांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात ९० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून आयोजन समितीचे पदच्युत अध्यक्ष व पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी, आयोजन समितीचे तत्कालीन सचिव ललित भानोत आणि अन्य ६ जणांसह स्विस टाइमिंग ओमेगा कंपनीविरुद्ध सोमवारी केंद्रीय गुन्हा अन्वेषण खात्याच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने फसवणूक, कटकारस्थानांसह विविध आरोप निश्चित केले.
येत्या २० फेब्रुवारीपासून कलमाडी यांच्याविरुद्धच्या खटल्याची दैनंदिन सुनावणी होणार आहे. खटल्यातील साक्षीदारांची यादी सीबीआयने ७ फेब्रुवारीपर्यंत सादर करावयाची आहे. कलमाडींविरुद्ध आरोप निश्चित झाल्यामुळे आता केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकारचे नेतृत्व करणारा काँग्रेस पक्ष त्यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागलेले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी टायमिंग, स्कोअरिंग आणि रिझल्टस् (टीएसआर) प्रणालीचे कंत्राट स्विस टायमिंग ओमेगा कंपनीला बहाल करताना कलमाडी, भानोत आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी अवाच्या सव्वा दर लावून ९० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. या प्रकरणी कलमाडी यांना नऊ महिने तुरुंगवासही भोगावा लागला आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे माजी महासंचालक व्ही. के. वर्मा, माजी महासंचालक (खरेदी) सुरजीत लाल, माजी संयुक्त महासंचालक (क्रीडा) ए. एस. व्ही. प्रसाद आणि माजी कोषाध्यक्ष एम. जयचंद्रन यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. शिवाय फरिदाबादच्या जेम इंटरनॅशनलचे प्रवर्तक पी. डी. आर्य आणि ए. के. मदान, हैदराबादच्या एकेआर कन्स्ट्रक्शनचे ए. के. रेड्डी यांचा तसेच स्विस टायमिंग ओमेगा कंपनीलाही आरोपी बनविण्यात आले आहे. कलमाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम १३(१)(ड) तसेच १३ (२) अंतर्गत लोकसेवकाने गुन्हेगारी गैरवर्तन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय दंड विधानातील विविध कलमांखाली अस्सल दस्तावेज म्हणून बनावट कागदपत्रे सादर करणे, पुरावे नष्ट करणे, फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचणे, गुन्हेगारी स्वरूपाचा दबाव आणणे आदी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याचे न्यायालयाने २१ डिसेंबर २०१२ रोजी आदेश दिले होते.
या खटल्यात सोमवार आणि शुक्रवार वगळता रोज साक्षी नोंदविण्यात येतील, असे न्या. रविंदर कौर यांनी स्पष्ट केले. कलमाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. कलमाडी यांच्यावरील आरोप निश्चित झाल्यामुळे आता काँग्रेस पक्ष त्यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागलेले आहे. अजूनही काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले कलमाडी यांची काँग्रेस हकालपट्टी करणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्विस कंपनीलाच कंत्राट द्यायचे होते..
टायमिंग, स्कोअरिंग आणि रिझल्टस् प्रणालीसाठी स्पेनची कंपनी एमएसएलची ६२ कोटी रुपयांची निविदा फेटाळून लावण्यात आली आणि त्याऐवजी स्विस टायमिंग ओमेगाला महागडय़ा दरात कंत्राट देण्यात आले. त्यामुळे सरकारचे ९० कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने करण्यात आला. हे कंत्राट स्विस टायमिंग ओमेगालाच द्यायचे, असे आयोजन समितीने निविदा मागविण्यापूर्वीच ठरवून टाकले होते, असाही आरोप सीबीआयने केला. या कंत्राटाला विरोध करणारे व्ही. के. गौतम आणि सुजीत पाणिग्रही यांना आयोजन समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते. सीबीआयचे आरोप न्यायालयात सादर केलेल्या दस्तावेजाशी विसंगत असल्याचा दावा कलमाडी यांच्या वतीने करण्यात आला.