राष्ट्रगीतात अधिनायक हा शब्द काढून तेथे मंगल हा शब्द टाकावा कारण अधिनायक हा शब्द ब्रिटिश राजवटीचे गुणगान करणारा आहे, असे राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी सांगितले. राजस्थान विद्यापीठाच्या २६ व्या पदवीदान कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, अधिनायक हा शब्द ब्रिटिशांची स्तुती करणारा आहे त्यामुळे राष्ट्रगीतात सुधारणा करणे गरजेचे आहे, ती ओळ जनगण मन मंगल गाये अशी असायला हवी.
राष्ट्रगीत डिसेंबर १९११ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. त्यावेळी त्यात ब्रिटिशांची स्तुती असल्याची टीका झाली होती पण टागोर यांनी १९३७ मध्ये पुलिन बिहारी सेन यांना पाठवलेल्या पत्रात हा आरोप फेटाळला होता.  महामहीम हा शब्द न वापरता माननीय हा शब्द वापरावा अशी सूचना करून ते म्हणाले की, गव्हर्नर हा कधीही महान नसतो पण ब्रिटिश काळापासून हा शब्द वापरात आहे. ते म्हणाले की, महाराणा प्रताप यांचे जीवन शिक्षणक्रमात शिकवले गेले पाहिजे, राणी व्हिक्टोरिया महान नव्हती, झाशीची राणी महान होती, औरंगजेब महान नव्हता तर शिवाजी महाराज महान होते, अकबर महान नव्हता तर महाराणा प्रताप महान होते.