17 December 2017

News Flash

कमल हासन माझे विरोधक नाही, मी त्यांना का त्रास देऊ – जयललिता

कमल हासन हे काही माझे विरोधक नाहीत. त्यामुळे मुद्दामहून त्यांचा चित्रपटावर बंदी कशासाठी घालेन,

चेन्नई | Updated: January 31, 2013 3:06 AM

कमल हासन हे काही माझे विरोधक नाहीत. त्यामुळे मुद्दामहून त्यांचा चित्रपटावर बंदी कशासाठी घालेन, अशा शब्दात तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी हासन यांना उत्तर दिले आहे. विश्वरुपम चित्रपटाच्या प्रदर्शनावर तमिळनाडू सरकारने बंदी घातली आहे. तमिळनाडूमधील अंतर्गत राजकारणाचा मला फटका बसत असल्याचा आरोप हासन यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना जयललिता म्हणाल्या, हा चित्रपट तयार करताना हासन यांनी पुरेसा विचार केला आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांनी मोठा खर्च केला. त्यासाठी त्यांनी आपली मालमत्ता गहाण ठेवली. वयाची साठी जवळ आलेल्या विचारी माणसाने घेतलेला हा निर्णय आहे. आता या निर्णयावरून ते राज्य सरकारला कसे काय दोष देता आहेत.
वैयक्तिक मला कोणत्याही चित्रपटांमध्ये रस नाही. या चित्रपटावर इतरही राज्यांत बंदी घालण्यात आली आहे. मग त्याबद्दलही मलाच दोष देणार का, असा प्रश्न त्यांनी हासन यांना विचारला आहे. तमिळनाडू सिनेमा नियामक कायदा १९५५ नुसारही मी चित्रपटावर बंदी घालू शकले असते. पण मी तसे केले नाही. चित्रपटावरून निर्माण झालेले वाद दोन्ही बाजूच्या लोकांनी परस्परांशी बोलून मिटवावा. एवढीच माझी अपेक्षा आहे, असे जयललिता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

First Published on January 31, 2013 3:06 am

Web Title: kamal haasan not my rival in any way why should i victimise him says jayalalithaa