सध्याचे राजकारणी कुठल्याही गोष्टीवरून वाद उकरून काढायला सदैव तयार असतात, असे वक्तव्य अभिनेता कमल हसन यांनी केले. चेन्नई येथील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या ‘पद्मावत’वरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थितीविषयी भाष्य केले.

चित्रपटांवरून राजकीय वाद निर्माण होत असल्यामुळे सध्या कला क्षेत्रात तणावाचे वातावरण आहे. मी यापूर्वी केलेले अनेक चित्रपट आताच्या काळात प्रदर्शित होऊच शकले नसते. मी ‘अनबे सिवन’ करू शकलो नसतो. तसे केल्यास मला कोर्ट-कचेरीच्या फंदात अडकावे लागले असते. ‘दशावतरम’ आणि ‘वरूमयिन निरम सिगप्पु’ या चित्रपटांचीही तीच गत झाली असती. कोण जाणे, माझ्या आगामी ‘इंडियन २’ चित्रपटालाही विरोधाचा सामना करावा लागू शकतो.

एखादी गोष्ट फायदा मिळवून देत असेल तर राजकारणी त्या गोष्टीवरुन राजकारण करण्यासाठी सदैव तयार असतात. आपल्याला नेमके कुठपर्यंत जायचे आहे, याबद्दल त्यांच्याकडे थोडीशीही दृष्टी नसते. फक्त एका मुद्द्यावरून दुसऱ्या मुद्द्यावर उडी मारणे, असाच त्यांचा प्रवास सुरु असतो. त्यामुळे जिथे वादाची तिळमात्र शक्यता नसेल तिथेही राजकारणी वाद निर्माण करु शकतात. मला सांगा, ‘पद्मावत’ चित्रपटावरून वाद निर्माण करायचे काय कारण होते? मात्र, तरीही भावना दुखावल्याचे कारण देत निष्पाप शाळेच्या मुलांवर दगडफेक करण्यात आली. हे सगळे खूपच हास्यास्पद असल्याचे कमल हसन यांनी म्हटले.

कमल हसन यांच्या अनेक चित्रपटांवरून यापूर्वी वाद निर्माण झाले होते. त्यामुळे अनेकदा कमल हसन यांना चित्रपटाच्या नावात बदल करणे किंवा एखाद्या आक्षेपार्ह दृश्यात बदल करणे, यासारख्या तडजोडी कराव्या लागल्या होत्या. २०१३ मध्ये त्यांच्या ‘विश्वरूपम’ या चित्रपटावर तामिळनाडू सरकारने बंदी घातली होती. मात्र, इतक्या विरोधानंतरही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात मी यशस्वी ठरलो, असे कमल हसन यांनी सांगितले.