अभिनेता आणि राजकीय नेते कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली असून लडाखमधील भारतीय आणि चिनी सैनिकांच्या चकमकीवरुन लोकांच्या भावनांशी खेळू नका असं म्हटलं आहे. लोकांना भावनिकरित्या हाताळणं बंद करा अशा शब्दांत त्यांनी सुनावलं आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले असून चीनचंही मोठं नुकसान झालं आहे.

नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा विरोध करणारे वक्तव्याचा विपर्यास लावत आहेत अशी टीका केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याने कमल हासन यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही वा लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं.

“अशा प्रकारची वक्तव्यं करुन लोकांच्या भावनांशी खेळलं जात आहे. माझी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना असं करणं बंद करा अशी विनंती करायची आहे,” असं कमल हासन यांनी म्हटलं आहे. “प्रश्न विचारणं देशविरोधी होत नाही. आपल्या घटनेने प्रश्न विचारण्याचा हक्क दिला आहे आणि जोपर्यंत सत्य ऐकायला मिळत नाही आम्ही प्रश्न विचारत राहणार,” असं कमल हासन यांनी सांगितलं आहे.

शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करताना नियंत्रण रेषेवर नेमकं काय झालं याबद्दल योग्य माहिती दिली नसल्याची टीका केली होती. “संपूर्ण माहिती देऊ शकत नाही हे समजू शकतो, पण विरोधकांना आणि देशवासियांना अशा संवेदनशील घटनांची योग्य माहिती दिली पाहिजे,” असं मत कमल हासन यांनी व्यक्त केलं आहे.

‘आपल्या लष्करावर अविश्वास दाखवू नका किंवा देशविरोधी होऊ नका असं म्हणण्यापेक्षा योग्य माहिती दिलं तर जास्त चांगलं होईल,” असं कमल हासन यांनी म्हटल आहे. पारदर्शकता आणि जबाबदारी असली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग यांच्या भेटीनंतर हे मुत्सद्दी यश असल्याचं दावा करण्यावरुनही कमल हासन यांनी टीका केली आहे. “आठ महिन्यांनी चीनने आपल्या जवानांची हत्या करत पाठीवर वार केला आहे. एक तर हे भेटीचं अपयश आहे किंवा सरकारला चीनचा हेतूच कळला नाही,” अशा शब्दांत कमल हासन यांनी टीका केली आहे.