चित्रपटसृष्टीनंतर आता राजकारणात नेते म्हणून प्रवेश केलेले अभिनेता कमल हासन यांनी कावेरी नदीच्या मुद्द्यावर न्याय देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. कमल हासन यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुलं पत्र लिहिलं आहे. सोबतच एक व्हिडीओही अपलोड केला आहे. या व्हिडीओत कमल हासन निडणुकीपेक्षा माणूस जास्त महत्त्वाचा असून लवकरात लवकर न्याय केला जावी अशी मागणी करत आहेत. सोबतच तामिळनाडूमधील जनता हताश आहे, त्यामुळे लवकरात लवकर कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळ गठीत केलं जाव अशी मागणीही त्यांनी केली आहे.

याचवेळी कमल हासन यांनी व्हिडीओत बोलताना सांगितलं की, ‘तुम्ही कर्नाटक निवडणुकीमुळे निर्णय़ घेण्यास उशीर करत आहात असा आरोप होत आहे. तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊन या आरोपाला उत्तर दिलं पाहिजे’.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चेन्नईतील एक्स्पोला हजेरी लावण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतल्याच्या काही वेळानंतर कमल हासन यांनी हा व्हिडीओ अपलोड केला. कार्यक्रमस्थळ राजधानीपासून ७० किमी लांब होतं, सोबतच विरोधकांनी कावेरी मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्या कारणानेच मोदींनी हेलिकॉप्टरने प्रवास केला.

‘तामिळनाडू जो न्याय मागत आहे तो तुम्ही अत्यंत सहजपणे मिळवून देऊ शकता’, असंही कमल हासन यंनी म्हटलं आहे. यावेळी विरोध म्हणून त्यांनी काळा टी-शर्ट घातला होता.

‘सर्वोच्च न्यायालयाने आधीच निर्णय़ सुनावत आपली घटनात्मक भूमिका निभावली आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी करत आपलं घटनात्मक कर्तव्य बजावण्याची तुमची वेळ आहे’, असं कमल हासन यांनी आपल्या खुल्या पत्रात लिहिलं आहे.