काँग्रेस नेते कमलनाथ यांचे मत; ‘आघाडीचे सरकार अपरिहार्य’
काँग्रेस लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करील, पण बहुमत मात्र मिळणार नाही. त्यामुळे केंद्रात सरकार स्थापनेसाठी आघाडी करावी लागेल, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केले.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळणार नाही. निवडणुकीनंतर आघाडीला महत्त्व राहील, त्यात अनेक पर्याय असतील असा दावा त्यांनी केला. सध्या दोन गट दिसत आहेत, एक भाजपसमर्थक व दुसरी भाजपविरोधी आघाडी आहे. भाजपची आघाडी फार लहान आहे. पक्षाच्या जाहीरनाम्यातील न्याय योजनेबाबत त्यांनी सांगितले, की ही योजना अमलात आणली जाईल. त्यासाठी आर्थिक साधने आहेत. ती कशी वापरायची हे फक्त ठरवावे लागेल.
प्राप्तिकर खात्याने निकटवर्तीयांवर घातलेल्या छाप्यांबाबत त्यांनी सांगितले, की अश्वनी शर्मा या माणसाला मी कधी भेटलेलो नाही. त्याने तो भाजपचा असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाशी माझा संबंध नाही. केंद्र सरकारने राजकीय हेतूंसाठी छापे घातले, पण कक्क र यांच्या निवासस्थानी छाप्यात काही सापडले नाही असे त्यांनी स्पष्ट केले. संसद हल्ला, कारगिल हल्ल्यासह जास्तीत जास्त दहशतवादी हल्ले हे भाजप सत्तेवर असताना झाले. तुम्ही लोकांना किती मूर्खात काढणार आहात. खोटी आश्वासने पंतप्रधानांनी दिली. अच्छे दिनचे काय झाले असा सवाल त्यांनी केला.
मध्य प्रदेशात २९पैकी २२ जागा काँग्रेसला मिळतील असा दावाही केला. गेल्या वेळी तीन जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला जर बहुमत मिळाले तर राहुल गांधी पंतप्रधान होतील. – कमलनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
First Published on April 22, 2019 1:18 am