मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दणका दिला. कमलनाथ यांच्या वादग्रस्त विधानांची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने ‘आघाडीचे प्रचारक’ यादीतून त्यांचे नाव हटवले. त्यामुळे कमलनाथ यांच्या प्रचाराचा खर्च काँग्रेस पक्ष नव्हे तर उमेदवाराला करावा लागणार आहे.

कमलनाथ यांनी सातत्याने वादग्रस्त विधाने करून आचारसंहितेचा भंग केला आहे. आयोगाने त्यांना समज दिली होती, त्याची देखील दखल कमलनाथ यांनी घेतली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या ‘आघाडीचे प्रचारक’ यादीतून त्यांना वगळण्यात आले असल्याचे निवडणूक आयोगाने आदेशात नमूद केले आहे.

मध्य प्रदेशमध्ये ३ नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या २८ जागांसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसच्या वतीने कमलनाथ प्रमुख प्रचारक आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या समर्थक आमदारांनीही राजीनामा देत भाजपमध्ये जाणे पसंत केल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक प्रचारातील आघाडीच्या प्रचारकांची यादी पक्षाला निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागते. या आघाडीच्या प्रचारकांचा खर्च पक्षाच्या वतीने केला जातो अन्यथा तो खर्च उमेदवाराच्या खर्चात जमा होतो.

भाजपच्या नेत्या इमरती देवी यांना ‘आयटम’ अशी कुत्सित टिप्पणी कमलनाथ यांनी जाहीरसभेत केली होती. त्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनीही कमलनाथ यांच्या विधानांवर नाराजी व्यक्त केली होती मात्र, त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना ‘नौटंकी कलाकार’ म्हटले होते. निंदानालस्ती करणाऱ्या शब्दांचा वापर योग्य नसल्याची समज निवडणूक आयोगाने कमलनाथ यांना दिली होती.

कमलनाथ  यांना अधिकाऱ्यांकडून पक्षप्रचारक म्हणून कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. त्यांनी यापुढे प्रचार केल्यास दौऱ्याचा पूर्ण खर्च उमेदवाराला करावा लागेल.

भाजपनेते विजयवर्गीय यांच्यावरही आचारसंहिता भंगाचा ठपका

नवी दिल्ली : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह व कमलनाथ यांना ‘चुन्नू-मुन्नू’ संबोधल्याने भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्याकडून निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला आहे, असे निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केले. विजयवर्गीय यांनी जाहीरपणे हे शब्द वापरायला नको होते असे आयोगाने स्पष्ट केले.  निवडणूक आयोगाने २६ ऑक्टोबरला विजयवर्गीय यांना नोटीस दिली असून त्या नोटिशीत म्हटले आहे, की इंदोरमधील सनवेर येथे केलेल्या वक्तव्याबाबत ही नोटीस जारी करण्यात आली आहे. विजयवर्गीय यांनी त्यांना ‘गद्दार- देशद्रोही’ असेही संबोधले होते.