मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांची सध्या सर्वत्रच चर्चा आहे. त्यांनी विरोधकांवर टीका करण्यासाठी वापरलेल्या शब्दांमुळे त्यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील नाराज झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. आता या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांच्याकडून केल्या गेलेल्या टीकेला भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

”कमलनाथ यांनी म्हटले की मी कुत्रा आहे. होय…, कमलनाथ यांनी ऐकावं. मी कुत्रा आहे कारण माझा मालक माझी जनता आहे, जिची सेवा मी करतो आहे. होय कमलनाथ मी कुत्रा आहे कारण कुत्रं आपल्या मालकाचं रक्षण करत असतं. होय कमलनाथ मी कुत्रा आहे, कारण जर का कोणताही व्यक्ती माझ्या मालकाकडे बोट दाखवेल, मालकाशी भ्रष्टाचार व त्याला नुकसान होईल असं धोरण दाखवेल. तर हे कुत्रं त्या व्यक्तीला चावल्याशिवाय राहणार नाही. होय मी कुत्रा आहे. मला अभिममान आहे की मी माझ्या जनतेचं कुत्रं आहे.” असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी अशोकनगर येथील एका सभेत कमलनाथ यांना उद्देशुन म्हटलं आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दणका दिला आहे. कमलनाथ यांच्या वादग्रस्त विधानांची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने ‘आघाडीचे प्रचारक’ यादीतून त्यांचे नाव हटवले आहे. त्यामुळे कमलनाथ यांच्या प्रचाराचा खर्च काँग्रेस पक्ष नव्हे तर उमेदवाराला करावा लागणार आहे.

मध्य प्रदेशमध्ये ३ नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या २८ जागांसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसच्यावतीने कमलनाथ प्रमुख प्रचारक आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेससोडून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या समर्थक आमदारांनीही राजीनामा देत भाजपामध्ये जाणे पसंत केल्याने ही पोटनिवडणूक होत आहे.

भाजपच्या नेत्या इमरती देवी यांना ‘आयटम’ अशी कुत्सित टिप्पणी कमलनाथ यांनी जाहीरसभेत केली होती. त्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनीही कमलनाथ यांच्या विधानांवर नाराजी व्यक्त केली होती मात्र, त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना ‘नौटंकी कलाकार’ म्हटले होते. निंदानालस्ती करणाऱ्या शब्दांचा वापर योग्य नसल्याची समज निवडणूक आयोगाने कमलनाथ यांना दिली होती.