मध्य प्रदेशात 15 वर्षांनंतर काँग्रेस पक्ष सरकार स्थापण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात जोरदार चूरस पाहायला मिळत आहेत. मात्र, मध्य प्रदेश काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून गुरूवारी याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी घोषणा करतील असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने सुत्रांद्वारे दिलं आहे.

भोपाळमध्ये विधिमंडळाच्या झालेल्या बैठकीत कमलनाथ यांच्या नावाला सर्व आमदारांनी सहमती दर्शवल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे, उद्या (दि.१४) दुपारी कमलनाथ हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं वृत्त न्यूज 18 ने दिलं आहे. या वृत्तानुसार, कमलनाथ यांच्या मंत्रीमंडळात एकूण 34 मंत्र्यांचा समावेश असेल. त्यापैकी 12 ते 15 मंत्री कमलनाथ यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतील. यामध्ये सज्जन सिंह वर्मा, तुलसी सिलावट, जीतू पटवारी, आरिफ अकील, विजय लक्ष्मी साधो, केपी सिंह, बाला बच्चन, गोविंद राजपूत, इमरती देवी, सचिन यादव, कमलेश्वर पटेल, हिना कावरे, तरुण भानोट, लक्ष्मण सिंह, एनपी प्रजापति, दीपक सक्सेना, संजय शर्मा (तेंदुखेडा), झूमा सोलंकी यांचा समावेश जवळपास निश्चीत असणार आहे.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 114 जागांवर विजय मिळाला असून भाजपला 109 जागा मिळाल्या आहेत. दोन जागा मिळालेल्या बसपने आणि एक जागा मिळालेल्या समाजवादी पक्षाने तसेच चार अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याने बहुमतासाठीच्या 116 जागांचे पाठबळ सरकारला सहज लाभले आहे.