अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या सिनेटर कमला देवी हॅरिस यांची निवड केली. निवडून आल्यास त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष असतील. शिवाय पहिल्या भारतीय-अमेरिकी तसेच आफ्रिकी उपाध्यक्ष असतील. कमला यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच आता त्यांचे चेन्नईमधील बसंत नगरमधील वरासिद्धी विद्यानगर मंदिराशी असणारं खास नातंही समोर आलं आहे. कमला यांच्या मावशीने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा जेव्हा त्यांनी कमला यांची उमेदवारी दाखल केलेल्या महत्वाच्या निवडणुकांआधी या मंदिरामध्ये १०८ नारळ फोडले तेव्हा कमला यांचा विजय झाला आहे.

कमला यांच्या आई श्यामला गोपालन या मंदिराची उभारणी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मंदिर समितीमध्ये होत्या. त्याचबरोबरच नऊ वर्षांपूर्वी जेव्हा कमला देवी यांनी कॅलिफोर्नियाच्या अटॉनी जनरल पदासाठी निवडणूक लढली होती तेव्हा त्यांनी या मंदिरामध्ये विजयासाठी प्रार्थना करायला सांगिलती होती. कमला यांनी आपल्या मावशीला फोन करुन “मावशी, माझ्यासाठी प्रार्थना कर आणि देवळामध्ये नारळही फोड,” असं सांगितलं होतं.

आणखी वाचा- कोण आहेत अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या कमला हॅरीस? जाणून घ्या…

कमला यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मावशीने मंदिरामध्ये १०८ नारळ फोडले होते. पारंपरेनुसार अशापद्धतीने नारळ फोडल्याने कोणत्याही कार्यामधील विघ्न दूर होते. कमला यांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी आपल्या मावशीला फोन करुन, “तू फोडलेल्या नारळांचा फायदा झाला मावशी. तू फोडलेल्या प्रत्येक नारळामागे मला एक हजार मतं मिळाली आहेत,” असं सांगितलं होतं. त्यानंतर सहा वर्षींनी कमला यांनी २०१६ साली सिनेटर पदाची निवडणूक लढवली तेव्हा गोपालन यांनी पुन्हा १०८ नारळ फोडले होते. त्या निवडणुकीमध्येही कमला यांचा विजय झाला होता. मात्र आता ज्या निवडणुकीसाठी कमला उभ्या आहेत त्यासाठी गोपालन या अगदी एक हजार ८ नारळ फोड्यासही तयार आहेत. “आम्ही आता बसंत नगरमध्ये राहत नाही. मात्र आम्ही जेव्हा तिकडे जाऊ तेव्हा मी नक्की नारळ फोडणार आहे,” असं कमला यांच्या मावशीने ‘बिझनेस लाइन’शी बोलताना सांगितलं.

आणखी वाचा- …तेव्हा ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्या प्रचार अभियानाला दिली होती ६ हजार डॉलर्सची देणगी

कमला यांची आई श्यामल यांची छोटी बहीण म्हणजेच कमलाची मावशी सरला या पेशाने डॉक्टर आहेत. श्यामलने पाठिंबा दिल्यानेच आज कमला एवढ्या दूरपर्यंत जाऊ शकली अशी भावना सरला यांनी व्यक्त केली आहे. “माझी बहीण खूप लहान वयामध्येच अमेरिकेला गेली. ती खूप आधुनिक विचारांची होती. तिने नेहमीच आपल्या मुलांना काय बरोबर काय चूक याचं ज्ञान दिलं,” असं सरला सांगतात. कमला यांना जे आवडतं ते श्यामलने तिला करु दिला. तर कमला यांनाही आईने दिलेल्या संधीचं सोनं केलं. तर कमलाचे आजोबा म्हणजेच पीव्ही गोपालन यांनी तिला अगदी लहान वयामध्येच सामाजिक भान कसं जपावं याची जाणीव करुन दिली. २००९ साली श्यामल यांचा मृत्यू झाला जेव्हा कमला या अस्थिविसर्जनासाठी चेन्नईला आल्या होत्या. आपल्या अस्थींचे विसर्जन बंगालच्या उपसागरामध्ये करावं अशी श्यामल यांची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठीच कमला भारतामध्ये आल्या होत्या.

काही वर्षांपूर्वी निवडणुकीमधील विजयानंतर सरला यांचे कमला यांच्याशी बोलणं झालं होतं, तेव्हा त्यांनी आत्मविश्वासाने, “मावशी मी इथेच थांबवणार नाहीय मी आणखीन पुढे जाणार आहे,” असं सांगितलं होतं. आता कमला यांचा हा प्रवास त्यांना व्हाइट हाऊसमध्ये घेऊन जातो का हे येणाऱ्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.