येत्या काही दिवसांत अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर निशाणा साधला. कमला हॅरिस यांना लोकांची पसंती नाही. त्या कधीही अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर तो अमेरिकेचा अपमान असेल, असं ट्रम्प यावेळी म्हणाले. तसंच लोकांनी हे लक्षात ठेवावं की जर बिडेन यांचा विजय झाला तर तो चीनचा विजय असेल असंही त्यांनी नमूद केलं.

ट्रम्प यांनी उत्तर कॅरोलिनामध्ये एका रॅलीला संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. “अमेरिकेची अर्थव्यवस्था जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. चीनच्या विषाणूमुळे आपली अर्थव्यवस्था ठप्प झाली. परंतु आता अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत,” असंही ट्रम्प म्हणाले. त्यांना (अमेरिकेच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस) लोकांची पसंती नाही. त्या कधीही अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकणार नाहीत. हा आपल्या देशाचा अपमान असेल,” असं ट्रम्प यांनी नमूद केलं.

ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्या करोना लसीच्या वक्तव्यावरूनही हल्लाबोल केला. कोणत्याही प्रकारच्या वक्तव्यावरून त्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष नाही बनू शकणार. लोकांना हे कोणतंही मोठं काम वाटू नये यासाठी हॅरिस यांनी लसीबाबत वक्तव्य केलं. परंतु मला नागरिकांसाठी ते यश मिळवायचं आहे. देशातील कोणताही नागरिक आजारी पडू नये अशी आपली अपेक्षा असल्याचंही ट्रम्प म्हणाले. याव्यतिरिक्त ट्रम्प यांनी चीनवरही निशाणा साधला. चीनसोबत आम्ही मोठा करार केला होता. परंतु काही काळ लोटत नाही तर करोना विषाणू आला. म्हणूनच या व्यापारी कराराकडे आपण निराळ्या पद्धतीनं पाहत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.