अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या सिनेटर कमला देवी हॅरिस यांची निवड केली. निवडून आल्यास त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष असतील. शिवाय पहिल्या भारतीय-अमेरिकी तसेच आफ्रिकी उपाध्यक्ष असतील.

कमला हॅरिस यांनी सिनेटर म्हणून केलेले काम कौतुकास्पद आहे. अमेरिकेत कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराच्या घटनांनंतर अशांतता माजली असताना हॅरिस यांची उमेदवारी डेमोक्रॅटिक पक्षाला फायदेशीर ठरणार आहे. कमला हॅरिस (वय ५५) या वकील असून कॅलिफोर्नियातील नेत्या आहेत. बायडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच कृष्णवर्णीय महिलेची निवड करून एक इतिहास घडवला आहे. हॅरिस यांचे वडील हे जमैकातील, तर आई भारतीय आहे.

बायडेन यांनी मंगळवारी दुपारी त्यांच्या समर्थकांना संदेश पाठवून कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली. डेमोक्रॅटिक  राष्ट्रीय अधिवेशनाच्या आधीच बायडेन यांनी ही घोषणा केली असून त्या अधिवेशनात बायडेन यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. ३ नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणूक होत असून त्यात ट्रम्प विरुद्ध बायडेन अशी लढत निश्चित आहे.

कमला हॅरिस या कॅलिफोर्नियाच्या महाधिवक्त्या असताना त्यांनी देशासाठी चांगले काम केले आहे. हॅरिस या मला उपाध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार वाटतात त्यामुळे आपण देशाच्या इतिहासाला पुन्हा एकदा रुळावर आणू या, असे बायडेन यांनी म्हटले आहे.

बायडेन यांनी मार्च महिन्यातच उपाध्यक्षपदासाठी महिलेची निवड करणार असल्याचे सूचित केले होते. त्यानंतर कृष्णवर्णीय महिलेची उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी निवड क रावी असा आग्रह अनेकांनी बायडेन यांच्याकडे धरला होता. त्याचवेळी आफ्रिकन कृष्णवर्णीय अमेरिकी लोकांचा पोलिसांनी छळ केल्याच्या घटना झाल्या. आफ्रिकी -अमेरिकी लोक व भारतीय-अमेरिकी लोक हा डेमोक्रॅटिक पक्षाचा मतदार वर्ग आहे.

हॅरिस यांच्याविषयी..

कमला हॅरिस या सध्या कॅलिफोर्नियाच्या सिनेटर आहेत. कृष्णवर्णीय मतदार हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात हे लक्षात घेऊन माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सल्ल्याने ही निवड करण्यात आली आहे. जानेवारी २०१९ मध्ये कमला हॅरिस यांनी अध्यक्षीय उमेदवारीच्या शर्यतीत उडी घेतली होती, पण त्यांच्या अध्यक्षीय उमेदवारीच्या प्रयत्नांना यश न आल्याने त्यांनी माघार घेऊन बायडेन यांना पाठिंबा दिला होता.