हैदराबाद : मुंबईतल्या १४ जणांचा बळी घेणाऱ्या कमला मिल अग्नितांडव प्रकरणातील मोजो ब्रिस्टो पबच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांपैकी युग पाठकला काही दिवसांपूर्वी अटक झाली आहे. मात्र, इतर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. यांपैकी युग तुली हा एक आरोपी असून तो हैदराबादमध्ये दिसल्याचे स्थानिक पोलिसांचे म्हणणे असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे युग तुलीलाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. या पबचे मालक प्रितीना श्रेष्ठी आणि सौमित्र श्रृंगारपूरे यांचाही शोध पोलीस घेत आहेत.

३० डिसेंबरच्या मध्यरात्री कमला मिल कंपाऊंड परिसरातील इमारतीला भीषण आग लागली होती. येथील मोजो ब्रिस्टो पबमधून या आगीला सुरुवात झाल्याचे अग्निशामक दलाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या पबच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर युग तुली हा हैदराबाद विमानतळावर दिसून आल्याचे हैदराबाद पोलिसांनी मुंबई पोलिसांना कळवले आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या सुचनेनुसार हैदराबाद पोलीस आता तुलाचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप तो पोलिसांच्या हाती आलेला नाही.

दरम्यान, कमला मिल आग प्रकरणाला कलाटणी देणारी कारवाई मंगळवारी मुंबई पोलिसांनी केली. देशभरातील बडय़ा सट्टेबाजांचा खबरी आणि अनेक भारतीय क्रिकेटपटूंचा मित्र विशाल कारिया याला ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी दिवसभराच्या चौकशीनंतर रात्री बेडय़ा ठोकल्या. गुन्हा नोंद झाल्यानंतर ‘वन अबव्ह’च्या मालकांना त्याने आश्रय दिल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.